“मुंगेरीलाल के हसीन सपने”, फडणवीसांनी का लावला राहुल गांधींना टोला?

नागपूर : कॉंग्रेस अल्पसंख्याक सल्लागार समितीच्या बैठकीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशातील आर्थिक असंतोषामुळे पुढील वर्षभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार कोसळणार, असा दावा केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पलटवार केला. ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ यापेक्षा वेगळे काही नसल्याचा टोला त्यांनी राहुल गांधी यांना लगावला.
नागपूरपासून जवळच असलेल्या गोंडखैरी येथे गोदाम लॉजिस्टिक पार्कच्या उद्घाटन समारंभानंतर ते प्रसारमाध्यमासोबत बोलत होते. देशातील आर्थिक आव्हाने आणि जनतेतील वाढती नाराजीचा परिणाम आगामी काळात देशाच्या राजकारणावर दिसून येईल. पुढील एका वर्षात मोदी सरकार कोसळेल, असा दावा राहुल गांधी यांनी केला, याकडे प्रसारमाध्यमाने फडणवीस यांचे लक्ष वेधले. त्यावेळी उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी समृद्धीचे अतिरिक्त काम अतिशय वेगाने सुरू असून त्याळे संपूर्ण विदर्भ हा औद्योगिकदृष्ट्या प्रगत होईल. त्यातून मालवाहतूक क्षेत्रातील किंमती कमी होईल तसेच मालवाहतूक क्षेत्रात रोजगाराची निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल, असेही त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी लॉजिस्टिक पार्कच्या उद्घाटन समारंभात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, पालघर जिल्ह्यातील डहाणूसमीप उभारले जात असलेले देशातील सर्वात मोठे वाढवण बंदरातील पहिले टर्मिनल २०२९ च्या सुरुवातीला सुरू होणार आहे. जगातील पहिल्या दहा बंदरामध्ये याचा समावेश होईल. या बंदरामुळे गुंतवणूक व पुरवठा क्षेत्रात संधी मिळणार असून मालवाहतूक क्षेत्रात देश ३० वर्षे पुढे जाईल. वाढवण बंदरापर्यंत पोहोचण्यासाठी समृद्धी महामार्गावरील इगतपुरीवरून मार्ग तयार करण्यात येत आहे. नागपूरवरून थेट बंदरापर्यंत पोहोचता येणार आहे. आज जगातील राजकीय स्थितीमुळे उत्पादन, मालवाहतूक (लॉजिस्टिक) क्षेत्रात संधी तयार होत असताना आव्हानेही आहेत. उत्पादन क्षेत्रापुढे मालवाहतुकीच्या किमतीचे मोठे आव्हान आहे.
हेही वाचा – घर, जमीन किंवा दुकान खरेदी करताय? ‘या’ ५ कायदेशीर कागदपत्रांची पडताळणी नक्की करा
आपल्याला जागतिक स्तरावर ठसा उमटवायचा असेल तर मालवाहतुकीच्या किंमतीचे अडथळे दूर करणे आवश्यक आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रस्ते, रेल्वे, विमानतळ, बंदरे आणि जलमार्ग क्षेत्रांसाठी सर्वसमावेशक पीएम गतिशक्ती योजना तयार केली. राज्य सरकारनेही नवीन मालवाहतूक धोरण तयार केले. यात महाराष्ट्रात विभागनिहाय लॉजिस्टिक पार्कसाठी कुठल्या सुविधा व सवलत देता येईल यावर भर दिला. या धोरणात मुंबईनंतर नागपूरला महत्त्वाचे स्थान दिले.
राज्यातील उद्योजकांनी हे धोरण स्वीकारत गुंतवणूक केली. आज नागपुरात सुरू झालेला अत्याधुनिक लॉजिस्टिक पार्क मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या लॉजिस्टिक पार्कसारख्या २० पार्कची नागपुरात गरज आहे. यापूर्वी केवळ मुंबई व पुण्यात उद्योग येत होते. आता नागपूर, नाशिक, गडचिरोलीही उद्योगाचे हब बनत आहे. त्याची गतिशिलता कायम ठेवण्यासाठी अत्याधुनिक सुविधा देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.





