#DevendraFadnavis | ‘जयकुमार गोरे प्रकरणात शरद पवार गटाचा हात’; मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप

मुंबई | राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने आरोप करत त्यांच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी सदर महिलेला सापळा रचून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. यातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जयकुमार गोरे प्रकरणाशी थेट संबंध असल्याचा आरोप सुप्रिया सुळे व रोहित पवार यांच्यावर केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की एखाद्याला आयुष्यातून उठवायच्या हेतूने राजकारण होत असेल तर ते योग्य नाही. गोरेंसंदर्भातली केस २०१६ मध्ये नोंद झाली, २०१९ ला संपली. ते तेव्हा सत्तापक्षातही नव्हते. पण त्यानंतर अचानक हे उकरून काढण्याचा प्रकार झाला. मी त्यांच्या हिंमतीची दाद देतो. एखादी व्यक्ती अशा स्थितीत गोष्टी मिटवण्याचा प्रयत्न करते. पण त्यांनी लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रार केली. त्यानंतर सापळा रचला. सगळं संभाषण रेकॉर्ड झालं. संभाषणाच्या अनेक क्लिप आहेत. पोलीस विभागाची खात्री पटल्यानंतर त्यांनी सापळा रचला. प्रत्यक्ष रोख रक्कम घेताना आरोपीला पकडण्यात आलं. त्यामुळे हा ब्लॅकमेलिंगचाच प्रकार होता.
हेही वाचा : MP Salary Hike | खासदारांच्या पगारात २४ टक्के वाढ! किती पगार मिळणार?
हे एक प्रकारचं नेक्सस होतं. या प्रकरणातील तिघा आरोपींना अटक झाली आहे. एक स्वत: ती महिला आहे. दुसरा हा पत्रकार तुषार खरात आहे आणि तिसरा अनिल सुभेदार नावाचा व्यक्ती आहे. या सगळ्यांनी मिळून हा कट रचला होता. याचे सगळे पुरावे सापडले आहेत. यांचं व्हॉट्सअॅप संभाषण सापडलं आहे. यांचे १५० फोन सापडले आहेत. यांनी कट कसा रचला हे समोर आलं आहे. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे यात थेट या सगळ्यांशी पूर्णपणे संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक दिसतात, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
प्रभाकर देशमुख यात थेट १०० वेळा या तिन्ही आरोपींशी बोलले आहेत. व्हिडीओ त्यांच्याकडे गेले आहेत. त्यांचंही उत्तर आलं आहे. पण त्याहीपेक्षा मला वाईट वाटतं ते म्हणजे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरात यांना झाले आहेत याचं. जयकुमार गोरेंचे जे व्हिडीओ झालेत, ते आरोपींनी या दोघांना पाठवले आहेत. आता याची चौकशी होईल. पण हे चाललंय काय? आपण राजकीय शत्रू नाही आहोत, आपण राजकीय विरोधक आहोत. अशा प्रकारे कुणाला जीवनातूनच उठवण्याचा कट रचला जात असेल तर हे चुकीचं आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा