ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वायसीएम रुग्णालयातील उपाहारगृहात गंभीर गैरसोयी!

शिवभोजन थाळी बंद, पाण्याचीही टंचाई : नगरसेविका योगीता नागरगोजे यांची आयुक्तांकडे तक्रार

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (YCM) रुग्णालयाच्या आवारातील उपाहारगृहातील सेवा आणि व्यवस्थापनाबाबत गंभीर गैरसोयी निर्माण झाल्याचा आरोप करत नगरसेविका योगिता नागरगोजे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांकडे सविस्तर लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकारामुळे रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसेच काही कर्मचारी वर्गातही तीव्र नाराजी निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

वायसीएम रुग्णालयात दररोज शहरासह ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर गरीब व गरजू रुग्ण उपचारासाठी येतात. अशा परिस्थितीत रुग्णालय परिसरात परवडणाऱ्या दरात भोजन व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी उपाहारगृहाची सुविधा सुरू करण्यात आली आहे. मात्र, सद्यस्थितीत या उपाहारगृहाच्या कामकाजात अनेक त्रुटी असल्याचे तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे.

तक्रारीनुसार, उपाहारगृहाचे संचालन साई सेवा इंटरप्राईजेस या खासगी संस्थेकडे सोपविण्यात आले असून, या ठिकाणी पूर्वी उपलब्ध असलेली अत्यल्प दरातील “शिवभोजन थाळी” सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना बाहेरून महागड्या दरात अन्नपदार्थ खरेदी करावे लागत आहेत. रुग्णालय परिसरातच स्वस्त व सुलभ भोजन मिळणे अपेक्षित असताना ही सेवा बंद झाल्याने सामाजिक उद्दिष्टालाच बाधा निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

हेही वाचा       :              ‘बटरफ्लाय गार्डन’मुळे थेरगावच्या वैभवात पडणार भर!

याशिवाय, उपाहारगृहात पिण्याच्या पाण्याची योग्य आणि स्वच्छ व्यवस्था उपलब्ध नसल्याची तक्रारही करण्यात आली आहे. रुग्ण व नातेवाईकांना सहजपणे मोफत पिण्याचे पाणी मिळण्याऐवजी, त्यांना पाण्यासाठी विकतच्या बाटल्या घ्याव्या लागत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. रुग्णालयासारख्या ठिकाणी ही परिस्थिती अत्यंत गंभीर आणि असुविधाजनक असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या सर्व परिस्थितीमुळे रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये असंतोष वाढत असून, उपाहारगृहाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. तसेच काही कर्मचारी वर्गानेही या अनियमिततेबाबत नाराजी व्यक्त केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

प्रशासन दखल घेणार का?

या पार्श्वभूमीवर नगरसेविका योगिता नागरगोजे यांनी पुढील उपाययोजना तातडीने करण्याची मागणी केली आहे. यामध्ये उपाहारगृहात बंद करण्यात आलेली शिवभोजन थाळी त्वरित पुन्हा सुरू करणे, अन्नपदार्थांचे दर परवडणारे व नियंत्रित ठेवणे, स्वच्छ व मोफत पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करणे, उपाहारगृहाच्या कामकाजावर नियमित देखरेख ठेवणे तसेच संबंधित ठेकेदार संस्थेच्या कामकाजाची चौकशी करून आवश्यक शिस्तभंगाची कारवाई करण्याचा समावेश आहे. या प्रकरणावर महापालिका प्रशासन कोणती भूमिका घेते आणि नागरिकांच्या तक्रारींवर काय निर्णय घेतला जातो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

“वायसीएम रुग्णालयातील उपाहारगृहात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मूलभूत सुविधा आणि परवडणारे भोजन मिळणे हा अधिकार आहे. शिवभोजन थाळी पुन्हा सुरू करणे, पिण्याच्या पाण्याची मोफत व्यवस्था आणि दर नियंत्रण या बाबतीत महापालिकेने तातडीने ठोस पावले उचलावीत. या विषयावर मी सतत पाठपुरावा करून नागरिकांना न्याय मिळवून देईन,”

– योगिता नागरगोजे, नगरसेविका, भाजपा.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button