Anna Bansode | विधानसभा उपाध्यक्षपदी आमदार अण्णा बनसोडेंची निवड

पिंपरी | राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. स्थापनेपासून मंत्रिपदाची प्रतीक्षा असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराला मंत्रीपदाचा दर्जा असलेले विधानसभेचे उपाध्यक्षपद मिळाले आहेत. बनसोडे यांनी उपाध्यक्षदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महायुतीकडे बहुमत असल्याने बनसोडे यांची सहज या पदावर निवड झाली आहे. अजित पवार यांनी मंत्रीपदाऐवजी एकेकाळी त्यांचा बालेकिल्ला असलेल्या शहरात उपाध्यक्षपद दिले आहे.
अण्णा बनसोडे यांनी महापालिकेत तीन टर्म नगरसेवक म्हणून काम केले आहे. स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषविले आहे. २०१४ च्या अपवाद वगळता पिंपरी मतदारसंघाच्या निर्मितीपासून ते विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. अण्णा बनसोडे यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून येण्याचा विक्रम केला आहे. राजकारणात येण्यापूर्वी बनसोडे चिंचवड येथे पान टपरी चालवत होते.
हेही वाचा : #DevendraFadnavis | ‘जयकुमार गोरे प्रकरणात शरद पवार गटाचा हात’; मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अतिशय निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीनंतर पहाटे भाजपसोबत सत्ता स्थापन करताना आणि जुलै २०२३ मध्ये शिवसेना-भाजप सरकारमध्ये सहभागी होताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत ते ठाम राहिले. तिसऱ्यांदा निवडून आल्याने महायुतीच्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळेल असा त्यांना विश्वास होता. परंतु, भ्रमनिरास झाला. त्यामुळे नाराज झालेले आमदार बनसोडे हे नागपूरमध्ये झालेले हिवाळी अधिवेशन सोडून मतदारसंघात आले होते. आता विधानसभेचे उपाध्यक्षपद देउन अजित पवार यांनी बनसोडे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.