भाजप नेत्या नवनीत राणा यांना हैदराबादहून धमकीचे पत्र

अमरावती | भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा जीव घेण्याची आणि लैंगिक अत्याचाराची धमकी देण्यात आली आहे. हैदराबाद येथील अब्दुल नावाच्या व्यक्तीकडून स्पीड पोस्टद्वारे हे धमकीचे पत्र नवनीत राणा यांच्या अमरावती येथील निवासस्थानी पाठवण्यात आले. गेल्या आठवडाभरात ही दुसरी धमकी असून, वारंवार होणाऱ्या या प्रकारांमुळे त्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
या संदर्भात नवनीत राणा यांचे खासगी स्वीय सहाय्यक मंगेश कोकाटे यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० ऑक्टोबर रोजी नवनीत राणा यांच्या निवासस्थानी एक पांढरा बंद लिफाफा स्पीड पोस्टद्वारे प्राप्त झाला. आज तो लिफाफा उघडून पाहिल्यानंतर हे पत्र अब्दुल नावाच्या व्यक्तीने हैदराबाद येथून पाठवले असल्याचे स्पष्ट झाले. पत्रातील मजकूर अत्यंत अश्लील आणि धमकीचा असून, राणा यांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ तसेच ठार मारण्याची आणि लैंगिक हिंसेची धमकी देण्यात आली असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
हेही वाचा : आरोग्य क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारण्यास प्राधान्य; उपमुख्यमंत्री अजित पवार
तक्रारीत असेही म्हटले आहे की, यापूर्वीही नवनीत राणा यांना अशाच प्रकारची दोन पत्रे प्राप्त झाली होती. त्या पत्रांमधील भाषाशैली आणि धमकीचा स्वर सध्याच्या पत्रासारखाच असल्याने, ही सर्व पत्रे एकाच व्यक्तीने पाठवली असावीत, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, आठवडाभरापूर्वी जावेद नावाच्या व्यक्तीने पाठवलेल्या पत्रातही राणा यांना “माझ्याकडे ५० जणांची टोळी आहे, तुझ्यावर गँगरेप करून मारून टाकू” अशी भयावह धमकी देण्यात आली होती. त्या प्रकरणातही राजापेठ पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. वारंवार होणाऱ्या या धमक्यांमुळे नवनीत राणा यांच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी त्यांच्या समर्थकांकडून होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास जलदगतीने सुरू केला असून, धमकी देणाऱ्याचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यात आले आहे.




