उमेदवारांची पहिली यादी भाजपकडून उद्या होणार जाहीर
विधानसभा निवडणुकांसाठी संघाकडूनही काही नावांची आग्रही मागणी
महाराष्ट्र : उमेदवारांची नावे जाहीर करण्यात महायुती आघाडीवर आहे. महाविकास आघाडीची यादी लांबणीवर पडणार आहे. भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर होणार आहे. महायुतीतल्या काही उमेदवारांना येत्या 48 तासात एबी फॉर्म दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाविकास आघाडीची पहिली यादी 20 तारखे नंतरच जाहीर होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या बैठकांमुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांच्या उमेदवारांची याद्याही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. याच आठवड्यात शिंदेंची शिवसेना आणि अजित दादांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे. महाविकास आघाडीतील यादी मात्र पुढच्या आठवड्यातच जाहीर होणार आहे.
विधानसभा निवडणुकांसाठी संघाकडूनही काही नावांची आग्रही मागणी आहे. एकाच मतदारसंघातून संघ आणि पक्षाकडून वेगवेगळ्या उमेदवारांच्या नावांसाठी आग्रह आहे. महाराष्ट्रात भाजप पक्ष संघटनेकडून केंद्रीय नेतृत्वाकडे विविध नेत्यांच्या उमेदवारीसाठी यादी पाठवण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला संघ विचार परिवाराकडे काही इच्छुक उमेदवारांनी आग्रह धरला आहे. त्यामुळे आता भाजपच्या यादीत हा समन्वय कसा साधला जाणार?, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.





