महिला रेल्वे प्रवाशांच्या मदतीसाठी धावणार आरपीएफची ‘मेरी सहेली’

नवी दिल्ली – रेल्वेतून एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी भारतीय रेल्वेने ‘मेरी सहेली’ हे अभियान सुरू केले आहे. त्यात आरपीएफच्या महिला पोलीस या महिला प्रवाशांना प्रवासात मदत करणार असून त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणार आहेत.
रेल्वेतून प्रवास करत असलेल्या एकट्या महिलांना अनेकदा छेडछाड आणि इतर संकटांना सामोरे जावे लागते. त्यामुळे अशा महिला प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी रेल्वेने आरपीएफच्या महिला पोलीस आणि अधिकाऱ्यांची ‘मेरी सहेली’ म्हणून निवड केली आहे. या महिला पोलीस आणि अधिकारी प्रत्येक रेल्वे स्टेशनवर गाडी येताच महिलांच्या डब्यात आणि एकट्याने प्रवास करत असलेल्या इतर डब्यांमध्ये जाऊन महिला प्रवाशांची चौकशी करणार आहेत. संबंधित महिला प्रवाशाला कोणती अडचण असल्यास किंवा कोणी त्रास देत असल्यास त्यावर या महिला कारवाई करणार आहेत. यामुळे रेल्वे प्रवासातील महिलांच्या छेडछाडीच्या तसेच महिलांसोबत होणाऱ्या इतर गुन्हेगारी कारवाया कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास रेल्वेला वाटतो. त्यासाठी आरक्षण तिकीटावर एकट्याने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची माहिती रेल्वे आरपीएफला देणार आहे.





