‘आमच्याशिवाय कुणाचंही सरकार येणार नाही’; आमदार बच्चू कडू यांचा मोठा दावा

Bacchu Kadu | राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान २० नोव्हेंबर रोजी झालं. आता निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचं सरकार येणार? महाविकास आघाडी की महायुतीचं सरकार येणार? याबाबत राजकीय नेत्यांकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. यातच, प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनीही सरकार स्थापनेबाबत मोठा दावा केला आहे.
बच्चू कडू म्हणाले, जवळपास एक महिना निवडणुकीच्या धावपळीत गेला. आम्ही १२ ही महिने काम करत असतो. मात्र, लोकांच्या कामांसाठी पळणं आणि निवडणुकीसाठी काम करणं वेगळं असतं. आम्ही या मतदारसंघात नक्की निवडून येऊ असा विश्वास आहे. मात्र, आम्हाला दोन्हीही राष्ट्रीय पक्ष पाडण्यासाठी प्रयत्न करत होते. ते जिंकण्यासाठी प्रयत्न करत नव्हते. त्यांच्यामध्ये मोठा संभ्रम होता. दुसरं म्हणजे महाराष्ट्रात १२२ पैकी महाशक्तीच्या २५ ते ३० जागा टॉप लढतीत आहेत. त्यामध्ये आमच्या १० जागा कोणत्याही परिस्थितीत निवडून येऊ शकतात अशी परिस्थिती आहे.
हेही वाचा – विधानसभा निकालापूर्वी प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…
सरकारच आमचं येईल. अपक्ष आणि छोट्या पक्षांचं सरकार बनेल. मोठ्या पक्षांचा बाहेरून पाठिंबा आम्ही घेऊ. तशा पद्धतीची चर्चा सुरु आहे. आमच्याशिवाय कोणतंही सरकार सत्तेत येणार नाही. महाविकास आघाडीला किंवा महायुतीला पाठिंबा देण्यापेक्षा आपणच सरकार बनवू आणि त्यांचा बाहेरून पाठिंबा घेऊ, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. तसेच एक्झिट पोलच्या अंदाजानुसार कोणत्याही पक्षाचं किंवा आघाडी आणि युतीच्या जागाचा आकडा बहुमतापर्यंत जात शकत नाही असं दिसत आहे. त्यामुळे आम्ही असल्याशिवाय सत्ता येऊ शकत नाही, असं बच्चू कडू म्हणाले.





