भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘करो या मरो’ सामना; सेमीफायनलसाठी असे आहे ‘गणितांचे’ समीकरण!

Womens T20 WC 2026 | महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाचा प्रवास आता अत्यंत रोमांचक वळणावर आला आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आज, २८ जून रोजी बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘करो या मरो’ (Do or Die) सामना खेळणार आहे. सेमीफायनलच्या (उपांत्य फेरी) दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला हा हाय-व्होल्टेज सामना ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर रंगणार आहे.
सध्या ‘अ’ गटात ऑस्ट्रेलियाचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर असून त्यांची उपांत्य फेरीतील जागा जवळपास निश्चित झाली आहे. तर भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे. आता भारताच्या या सामन्याच्या निकालावरच ‘अ’ गटातून सेमीफायनलमध्ये पोहोचणारा दुसरा संघ निश्चित होणार आहे.
सध्या भारत दुसऱ्या आणि दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानावर असून दोन्ही संघांचे प्रत्येकी ६-६ गुण आहेत. मात्र, सरस ‘नेट रन रेट’च्या (NRR) जोरावर भारतीय संघाने आघाडी घेतली आहे. बांगलादेशचा संघही तांत्रिकदृष्ट्या शर्यतीत असला, तरी त्यांची शक्यता खूपच कमी आहे. बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एक सामना अजून शिल्लक आहे.
भारताला सेमीफायनल गाठण्यासाठीचे समीकरण:
भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यास:
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर मात केल्यास भारताचे ८ गुण होतील आणि संघ थेट उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यातील सामन्याच्या निकालाचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही.
भारत हरला आणि दक्षिण आफ्रिका जिंकली तर:
जर ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केले आणि दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशवर विजय मिळवला, तर दक्षिण आफ्रिका ८ गुणांसह पुढच्या फेरीत जाईल आणि भारताचे (६ गुण) आव्हान संपुष्टात येईल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ हरले तर:
भारताचा पराभव झाल्यास, भारताला बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करावा अशी प्रार्थना करावी लागेल. अशा परिस्थितीत भारत, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश या तिन्ही संघांचे प्रत्येकी ६ गुण होतील. मात्र, चांगल्या ‘नेट रन रेट’मुळे भारत उपांत्य फेरीत प्रवेश करेल.
हेही वाचा
“इराणचे अस्तित्वच मिटवून टाकू”, डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा

पावसामुळे सामने रद्द झाले तर काय होणार?
दक्षिण आफ्रिका-बांगलादेश सामना रद्द झाल्यास: दक्षिण आफ्रिकेचे ७ गुण होतील. अशा वेळी भारताला कोणत्याही परिस्थितीत ऑस्ट्रेलियाला हरवावेच लागेल (कारण सामना रद्द झाला तरी भारताचे ७ गुण होतील पण चांगल्या रन रेटमुळे भारत पुढे जाईल, मात्र पराभूत झाल्यास भारत ६ गुणांवरच अडकेल).
भारताचा सामना रद्द झाला आणि आफ्रिका जिंकली तर: भारताचे ७ गुण होतील, तर दक्षिण आफ्रिका ८ गुणांसह पुढे जाईल आणि भारत बाहेर पडेल.
भारताचा सामना रद्द झाला आणि बांगलादेशने आफ्रिकेला हरवले तर: दक्षिण आफ्रिका ६ गुणांवरच थांबेल आणि भारतीय संघ ७ गुणांसह आरामात उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल.
त्यामुळे, आज लॉर्ड्सवर होणाऱ्या या महामुकाबल्यात हरमनप्रीत ब्रिगेड थेट विजय मिळवून दिमाखात सेमीफायनलचे तिकीट पक्के करते की समीकरणांच्या चक्रात अडकते, याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.





