“इराणचे अस्तित्वच मिटवून टाकू”, डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा

America Iran War Latest Updates | पश्चिम आशियातील युद्धाचे ढग पुन्हा एकदा गडद झाले असून, अमेरिका आणि इराणमधील तणाव आता शिगेला पोहोचला आहे. अवघ्या दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या शांतता कराराला केराची टोपली दाखवत इराणने व्यापारी जहाजांवर पुन्हा ड्रोन हल्ले सुरू केले. या चिथावणीखोर कारवाईला अमेरिकेने अत्यंत आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे. अमेरिकन हवाई दलाच्या विमानांनी इराणच्या लष्करी तळांवर आणि किनारपट्टीवरील रडार यंत्रणांवर सलग दुसऱ्या दिवशी भीषण बॉम्बहल्ला केला. या लष्करी कारवाईनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट इराणचे अस्तित्वच संपवून टाकण्याचा आक्रमक इशारा दिला आहे, तर इराणनेही अमेरिकेला चोख प्रत्युत्तर देण्याची भाषा केली आहे.
अमेरिका आणि इराणमधील सामंजस्य करार केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र आहे. गुरुवारी ‘M/V Ever Lovely’ या मालवाहू जहाजावर हल्ला झाल्यानंतर, शनिवारी ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’जवळ पनामाचा ध्वज असलेल्या ‘एमटी किकू’ या तेलवाहू जहाजावर इराणने आत्मघातकी ड्रोन डागला. या जहाजात तब्बल २० लाख बॅरलहून अधिक कच्चे तेल होते. या हल्ल्यामुळे संतप्त झालेल्या अमेरिकेने तात्काळ इराणवर लष्करी कारवाईचे आदेश दिले.
अमेरिकन सेंट्रल कमांडने स्पष्ट केले की, “इराणला शांतता कराराचा आदर करण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, त्यांनी ती नाकारली. म्हणूनच राष्ट्राध्यक्षांच्या थेट आदेशानंतर इराणमधील क्षेपणास्त्र, ड्रोन साठवणूक केंद्रे आणि किनारपट्टीवरील रडार तळांना लक्ष्य करण्यात आले आहे.” इराणी माध्यमांच्या संदर्भाने ‘रॉयटर्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, दक्षिण इराणमधील ‘सिरिक बेट’ आणि ‘केश्म बेटा’वरील गावांमध्ये अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे प्रचंड स्फोटांचे आवाज ऐकू आले.
“इराणचे अस्तित्व शिल्लक राहणार नाही!” – डोनाल्ड ट्रम्प
या भीषण लष्करी कारवाईनंतर अवघ्या काही मिनिटांतच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत इराणला गंभीर परिणामांची धमकी दिली. ट्रम्प यांनी लिहिले, “इराणने पुन्हा एकदा शांतता कराराचे उल्लंघन केले आहे. हे लोक कधीच सुधारणार नाहीत असे दिसतेय! एकवेळ अशी येईल जेव्हा आमचा संयम सुटेल आणि आम्ही सुरू केलेले लष्करी अभियान पूर्ण करण्यास आम्ही भाग पडू. जर असे घडले, तर जगात ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण’चे अस्तित्वच शिल्लक राहणार नाही!”
हेही वाचा
TET पेपर फुटप्रकरणात सरकार अँक्शन मोडवर, एसआयटी स्थापन करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश
“हिंसेचे उत्तर हिंसेनेच दिले जाईल” – जे. डी. व्हान्स
दुसरीकडे, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनीही इराणला खडे बोल सुनावले आहेत. “आम्ही कराराचे पालन केले. जर काही मतभेद होते, तर फोनवर चर्चा करायला हवी होती. पण हिंसेचे उत्तर हिंसेनेच दिले जाईल,” असे व्हान्स यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी मध्यरात्रीही दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले केले होते, ज्यामुळे परिस्थिती अधिक चिघळली आहे.
अमेरिकेला ‘जशास तसे’ उत्तर देणार; इराणचाही प्रतिहल्ला
अमेरिकेच्या या आक्रमक पवित्र्यासमोर इराण देखील मागे हटायला तयार नाही. इराणच्या बलाढ्य ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने (IRGC) अमेरिकन हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे. तसेच, या भागातील अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य केल्याचा दावा इराणने केला आहे. इराणने अमेरिकेला ‘जशास तसे’ उत्तर देणार असल्याचे म्हटले असले, तरी अमेरिकेच्या नेमक्या कोणत्या तळांचे आणि किती नुकसान झाले, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पश्चिम आशियातील या नव्या संघर्षाने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे.





