भाजपाचा नवाब मलिकांच्या उमेदवारीला विरोध; आशिष शेलार म्हणाले..
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार) नवाब मलिक यांना मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. भाजपा व शिवसेना शिंदे गटाच्या दबाव जुगारून अजित पवारांनी नवाब मलिकांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एबी फॉर्म दिला आहे. दरम्यान, नवाब मलिकांच्या उमेदवारीला भाजपाचे आमदार व मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी विरोध दर्शवला आहे.
आशिष शेलार म्हणाले, की महायुतीमधील सर्व पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर करायचे असं ठरलं होतं. विषय फक्त नवाब मलिकांच्या उमेदवारीचा होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार) मलिक यांना मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. उपमुख्यमंत्री व आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांबाबत यापूर्वीच आमची भूमिका सांगितली आहे. मी देखील वारंवार भाजपाची भूमिका स्पष्ट केली आहे. आज पुन्हा एकदा सांगतो की अजित पवारांनी मलिकांना उमेदवारी दिली असली तर भाजप त्यांचा प्रचार करणार नाही.
हेही वाचा – अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी, २ कोटी रूपयांच्या खंडणीची मागणी
भाजपाने मलिकांचा प्रचार करण्याचा प्रश्नच येत नाही. दाऊद इब्राहिमशी संबंधित खटल्यातील व्यक्तीच्या प्रचारात आम्ही सहभागी होणार नाही. दुसऱ्या बाजूला सना मलिक यांच्या प्रचाराबाबत प्रश्न विचारला जात आहे. सना मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने (अजित पवार) अणूशक्तीनगर मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. ज्या प्रकरणात नवाब मलिकांना अटक झाली होती, त्या प्रकरणातील सना मलिकांच्या सहभागाबद्दलचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही. असा कोणताही पुरावा मिळत नाही तोवर सना मलिक या राष्ट्रवादीच्या (अजित पवार) म्हणजेच महायुतीच्या आणि पर्यायाने भाजपाच्या उमेदवार असतील. आमचा त्यांना पाठिंबा आहे, असंही आशिष शेलार म्हणाले.