दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा
विधीमंडळ पक्षाची बैठक होईन, त्यात नवीन मुख्यमंत्र्यांची निवड केली जाईल
दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या दोन दिवसात मी माझ्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देईल, असे अरविंद केजरवाल म्हणाले. येत्या दोन दिवसांत विधीमंडळाची पक्षाची बैठक होईन, त्यात नवीन मुख्यमंत्र्यांची निवड केली जाईल, असेही अरविंद केजरीवाल यांनी म्हटले.
मद्य धोरण घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दोन दिवसांपूर्वी जामीन मंजूर करण्यात आला. यानंतर आता त्यांनी एक जाहीर सभा घेतली. या सभेदरम्यान अरविंद केजरीवाल यांनी मी दोन दिवसात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार अशी मोठी घोषणा केली. येत्या दोन दिवसांमध्ये मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन. त्यानंतर मी आणि मनिष सिसोदिया दोघेही लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधू, आम्ही गल्लोगल्ली फिरून लोकांशी बोलू. जर मी जनतेला प्रामाणिक वाटत असेन, तर त्यांनी मला निवडून द्यावे. मी बेईमान असेल तर जनतेने मला निवडून देऊ नये, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.
“…तर मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर जाऊन बसेन”
“सर्वोच्च न्यायालयाने गेल्या दोन दिवसात काही अटी केल्या आहेत, जेणेकरुन मी काम करु शकणार नाही. गेल्या १० वर्षात यांनी अटी शर्थी करण्यात काही कसर सोडली होती का? केंद्र सरकारने एक कायदा, दुसरा कायदा असे अनेक कायदे करत माझे अधिकार काढून घेतले. पण मी तुमची काम बंद केलेली नाही. केंद्राच्या अटी माझ्यासाठी अजिबात महत्त्वाच्या नाहीत. आपण त्या अटींनाही बघून घेऊ. पण माझ्यासाठी प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा आहे आणि तो मी कमावला आहे. जर केजरीवाल प्रामाणिक आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर माझ्या पक्षाला भरघोस मतदान करा. मी निवडणुकीनंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर जाऊन बसेन”, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले.
पुढील मुख्यमंत्री कोण? हे लवकरच होणार निश्चित
“फेब्रुवारीत निवडणुका होत आहेत. मी आता या मंचावरुन मागणी करतोय की ही निवडणूक नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रासोबत घ्या. जोपर्यंत निवडणुकांचा निकाल लागत नाही, जनमताचा कौल समोर येत नाही, तोपर्यंत मी जसा उल्लेख केला, त्याप्रमाणे मी दोन दिवसांनंतर माझ्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन. तोपर्यंत माझ्याऐवजी आप पक्षाचा दुसरा नेता मुख्यमंत्री होईल. येत्या दोन दिवसात विधीमंडळाची पक्षाची एक बैठक होईल. या बैठकीत पुढील मुख्यमंत्री कोण हे निश्चित केले जाईल”, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.
मनीष सिसोदिया देणार उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
“माझ्यासह मनीष सिसोदियाही उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्री हे पद तेव्हाच सांभाळतील, जेव्हा दिल्लीची जनता सांगेल की मनीष सिसोदिया प्रामाणिक आहेत. माझा आणि मनीष सिसोदिया आमच्या दोघांचाही निर्णय तुमच्या हातात आहे. आम्ही दोघेही लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधू, आम्ही गल्लोगल्ली फिरून लोकांशी बोलू. मी २०२० ला तुम्हाला सांगितलं होतं की जर मी काम केलं असेल तर मला मत द्या, अन्यथा देऊ नका. आज मी तुमच्यासमोर आलोय आणि तुम्हाला सांगतोय की जर मी प्रामाणिक असेन तर मला मतदान करा, अन्यथा मला मत देऊ नका”, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले.