अजय महाराज बारस्करांना मारहाण झाल्याचा प्रकार समोर
मनोज जरांगे पाटील यांच्यावर अजय महाराज बारस्कर यांची नेहमीच आगपाखड
अहिल्यानगर : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर वारंवार आरोप करणारे अजय महाराज बारस्कर यांना काल सायंकाळी मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.
अजय महाराज बारस्कर हे मनोज जरांगे पाटील यांच्यावर नेहमीच आगपाखड करताना दिसतात. मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे सकल मराठा समाजाचा बारस्कर महाराज यांच्यावर रोष आहे. पंढरपूर येथे आषाढी एकादशीला गेलेल्या बारस्कर यांचे चारचाकी वाहन जाळण्यात आल्याचा प्रकार घडला होता.
याप्रकरणी पंढरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल होता. मला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचेही त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, बारस्कर हे नगरमधील बोल्हेगाव येथे वास्तव्यास आहेत. काल सायंकाळी काही अनोळखी व्यक्तींनी त्यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला. ही मारहाण कोणी केली, कोणत्या कारणातून केली, याचे कारण मात्र अद्याप समोर आलेले नाही.





