ताज्या घडामोडीराजकारण

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे आनंदाचा शिधा वाटप थांबले

राजकीय नेत्यांचे फोटो असलेल्या पिशवीत तो आनंदाचा शिधा न देता स्वतंत्र द्यायचा

सोलापूर : राज्यातील ३३ लाखांहून अधिक सर्वसामान्य शिधापत्रिकाधारकांना गौरी- गणपतीचा शिधा अजूनही मिळाला नाही. त्याचे वाटप विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे थांबले. कारण, तो शिधा ज्या पिशवीतून द्यायचा आहे, त्यावर सत्ताधारी नेत्यांचे फोटो आहेत. धान्य गोदामात पडून असलेला आनंदाचा शिधा त्या पिशवीशिवाय वाटप करण्यास शासनाने परवानगी दिली आहे.

दरम्यान, गौरी- गणपतीचा उत्सव संपून आता दिवाळी तोंडावर आली, तरीदेखील रेशन दुकानांमधून सामान्य लाभार्थींना आनंदाचा शिधा मिळालेला नाही. त्यात साखर, चणा डाळ, तेल व रवा (प्रत्येकी एक किलो) या चार वस्तू आहेत. त्या वस्तू सरकारने अवघ्या १०० रुपयांत देण्याचा त्यावेळी निर्णय घेतला.

पण, त्या चार वस्तू पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे फोटो असलेल्या पिशवीतूनच द्यायच्या, अशी अट होती. त्यामुळे आता विधानसभा आचारसंहितेत त्या पिशवीतून आनंदाचा शिधा देण्यास अडचणी निर्माण झाल्या. एक महिन्यापूर्वी आलेला रवा, चणा डाळ खराब होऊ शकतो व लाभार्थी देखील रेशन दुकानात हेलपाटे मारत असल्याची वस्तुस्थिती होती. या पार्श्‍वभूमीवर त्या पिशवीशिवाय आचारसंहिता भंग होणार नाही याची खबरदारी घेऊन आनंदाचा शिधा वाटप करता येईल, असे शासन स्तरावरून स्पष्ट करण्यात आले आहे.

लाखो रुपयांच्या पिशव्या बिनकामाच्या
विद्यमान सरकारने राज्यातील पावणेदोन कोटी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्यासाठी लाखो रुपयांच्या पिशव्यांची छपाई करून त्या राज्यातील सर्व रेशन दुकानांना पाठवल्या. त्यावर पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे फोटो आहेत. पण आता त्या लाखो रुपयांच्या पिशव्या आचारसंहितेमुळे वापरता येणार नाहीत. त्या तशाच रेशन दुकानांमध्ये ठेवाव्या लागणार आहेत.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे आनंदाचा शिधा वाटप थांबले होते, पण आता राजकीय नेत्यांचे फोटो असलेल्या पिशवीत तो आनंदाचा शिधा न देता स्वतंत्र द्यायचा आहे. तसे निर्देश शासनाकडून प्राप्त झाले आहेत. वाटप करताना आचारसंहितेचा भंग होणार नाही याची सर्वांनी खबरदारी घ्यायची आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button