Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘डिजिटल प्रणालीवर आधारित लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यावर प्रशासनाचा भर’; पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

अमरावती :  शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी शासन कटिबद्ध असून, अमरावती शहर पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत वाढ व्हावी या उद्देशाने जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ३० नवीन अत्याधुनिक वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अमरावती शहर हे राज्याचे महत्त्वाचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक केंद्र असून, वाढत्या शहरीकरणानुसार सुरक्षिततेचे आव्हान पेलण्यासाठी शासन डिजिटल प्रणालीवर आधारित आणि लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यावर भर देत आहे.  ही नवीन अत्याधुनिक वाहने यात महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला.

शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी तसेच गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी अमरावती शहर पोलीस दलाच्या ताफ्यात ३० नवीन अत्याधुनिक वाहने दाखल झाली आहेत. या वाहनांचे लोकार्पण आज पोलीस आयुक्त कार्यालयात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते संपन्न झाले. अमरावती शहर पोलीस दलाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून या ३० नवीन वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. या वाहनांमुळे पोलिसांना गुन्ह्यांच्या ठिकाणी तत्परतेने पोहोचणे आणि गस्त घालणे अधिक सुलभ होणार आहे.

या सोहळ्याला आमदार संजय खोडके, सुलभा खोडके, राजेश वानखडे, महापौर श्रीचंद तेजवानी, प्रवीण पोटे-पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा –  विश्वशांतीसाठी सामुदायिक नवकार महामंत्र पठण

यावेळी पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की, अमरावती शहर हे शिक्षणाचे, संस्कृतीचे केंद्र आहे. येथे गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहेत. बदलत्या काळानुसार गुन्हेगारीचे स्वरूप बदलत असून सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. हे आव्हान पेलण्यासाठी शासन डिजिटल प्रणालीवर आधारित आणि लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यावर भर देत आहे. शहर अधिक सुरक्षित करण्यासाठी संपूर्ण अमरावतीत सीसीटीव्ही सर्वेलन्सचे जाळे विणले जाईल. यामुळे अवैध धंदे करणारे समाजकंटकांवर चाप बसणार आहे.

पोलिसांनी संवेदनशील ठिकाणांची यादी तयार करून तिथे विशेष बंदोबस्त ठेवावा. तसेच, ‘पोलीस मित्र’ संकल्पना राबवून सुरक्षिततेचा आढावा घ्यावा. महामार्गावर गोवंश तस्करी रोखण्यासाठी सुरक्षा वाढवण्याचे आणि रात्रीच्या वेळी दुचाकीवरून गोंधळ घालणाऱ्यांवर कडक कारवाई करा. प्रसारमाध्यमे ही समाजाचा आरसा आहेत. प्रसारमाध्यांमध्ये प्रसारीत होणाऱ्या बातम्यांवर त्वरित कार्यवाही करा. बातम्यांवर केलेल्या कार्यवाहीची  माहिती प्रसारमाध्यमांना द्या, असे निर्देश पालकमंत्री श्री. बावनकुळे त्यांनी यावेळी दिले.

पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांनी तर आभार पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी मानले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button