आम्हाला बारामतीचा ‘दादा’ बदलायचा आहे; कार्यकर्त्यांची शरद पवारांकडे मागणी

पुणे | आता लवकरच विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत होण्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, त्याआधी बारामतीमधील काही कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची भेट घेत मोठी मागणी केली आहे. आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे. कार्यकर्त्यांच्या या मागणीमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
शरद पवार बारामती दौऱ्यावर असताना गोविंद बागेत त्यांना भेटण्यासाठी काही कार्यकर्ते आले. यावेळी कार्यकर्त्यांनी म्हटलं, आम्हाला आता बारामतीचा दादा बदलायचा आहे. बारामतीत शांत दादा आणायचा आहे. गाव पुढाऱ्यांपुढे आमचं काही चालत नाही. युगेंद्र पवारांना संधी द्या, आमचं त्यांच्यावर लक्ष आहे, पण तुमचंही लक्ष असूद्या एवढीच आमची इच्छा आहे. त्यांना तुम्ही ताकद द्या, आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत. आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी शरद पवारांकडे केली.
हेही वाचा – ‘गोड बोलून माझा काटा काढण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु’; मनोज जरांगेंचा आरोप
यावर शरद पवार म्हणाले, उमेदवारीची चर्चा आता करु नका. लवकरच काय ते होईल. संयमी राहा, असा सल्ला शरद पवारांनी कार्यकर्त्यांना दिला. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीसारखं विधानसभेच्या निवडणुकीत बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार का? याबाबत आता बारामतीच्या राजकारणात चर्चा रंगताना पाहायला मिळत आहेत.





