स्वीकृत नगरसेवकांवरून ठाकरे बंधूंमध्ये मिठाचा खडा? चर्चांना उधाण

मुंबई | मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची झालेली युती राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली होती. मात्र निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यानंतर या युतीचं भवितव्य काय, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी उत्तर देणं टाळत “नो कॉमेंट्स” अशी प्रतिक्रिया दिली.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील अपयशानंतर मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून शिवसेना (ठाकरे) आणि मनसे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी हातमिळवणी केली होती. मात्र या युतीला अपेक्षित यश मिळाले नाही. परिणामी महापालिकेवर यंदा ठाकरेंचा भगवा फडकला नाही.
हेही वाचा : दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; ISI चा टेरर प्लॅन उधळला, ८ जण अटकेत
दरम्यान, स्वीकृत नगरसेवकपदावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीत मिठाचा खडा पडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आज माध्यमांनी याबाबत संजय राऊत यांना थेट प्रश्न विचारला. ठाकरे बंधूंच्या युतीत तणाव असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया विचारली असता राऊत काही क्षण थांबले आणि त्यांनी “नो कॉमेंट्स” एवढंच उत्तर दिलं. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे युतीबाबतच्या चर्चांना आणखी उधाण आले आहे.




