Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; फलटण हादरले

घराबाहेरील विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने एकामागून एक चौघांनी गमावले प्राण; महावितरणच्या निष्काळजीपणाची चौकशी सुरू

सातारा (फलटण) : जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील खामगाव येथे बुधवारी पहाटे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. घराबाहेर पडलेल्या विद्युत वायरमधील प्रवाहाच्या संपर्कात आल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. एकमेकांचे प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात संपूर्ण कुटुंबच काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा – ‘२२ जुलै ते २२ ऑगस्टदरम्यान राज्यभर ‘कृषी महोत्सव’चे आयोजन’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

या दुर्घटनेत किसन पिसुरड्या शिंदे (४८), गंगुबाई पिसुरड्या शिंदे (४६), सचिन पिसुरड्या शिंदे (२६) आणि आरती पिसुरड्या शिंदे (२२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव येथील एका खासगी इंग्लिश मीडियम शाळेजवळ शिंदे कुटुंब वास्तव्यास आहे. बुधवारी पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास कुटुंबप्रमुख किसन शिंदे घराबाहेर पडत असताना अंधारात घरासमोरील विद्युत वायरमधून उतरलेल्या प्रवाहाच्या संपर्कात आले. जोरदार विजेचा धक्का बसताच ते जागीच विव्हळू लागले.

किसन शिंदे यांना वाचवण्यासाठी पत्नी गंगुबाई, मुलगा सचिन आणि मुलगी आरती हे तातडीने धावून आले. मात्र, विद्युत प्रवाहाची तीव्रता इतकी जास्त होती की, एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात चौघेही विजेच्या विळख्यात अडकले आणि काही क्षणांतच सर्वांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.

दरम्यान, घराबाहेरील वायरमध्ये विद्युत प्रवाह नेमका कसा आला, यामागे महावितरणचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे का, याचा तपास फलटण ग्रामीण पोलीस करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे खामगावसह संपूर्ण फलटण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button