ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अर्थसंकल्पाबाबत पिंपरी- चिंचवडकर उदासीन!

शहरातील आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ११ जणांनी सुचवली कामे

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने सन 2022-2023 या आर्थिक वर्षांसाठी नागरिकांना दहा लाखा पर्यंतची कामे सुचविण्याच्या केलेल्या आवाहनाला नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळाला आहे. महिन्याभराच्या कालावधीत आठ प्रभागातून केवळ 11 जणांनीच अर्थसंकल्पासाठी कामे सुचविली आहेत. त्यामध्ये ‘ब’ प्रभागातून 10 तर ‘ड’ प्रभागातून 1 काम सुचविण्यात आले. तर, ‘अ’, ‘क’, ‘ग’, ‘फ’, ‘इ’ आणि ‘ह’ या सहा प्रभागातून एकही काम सुचिवण्यात आले नाही.

महापालिकेच्या अर्थसंकल्पात नागरिकांचा सहभाग वाढावा, यासाठी महापालिकेच्या वतीने 2007-08 या आर्थिक वर्षापासून नागरिकांनी सुचविलेल्या कामांचा अर्थसंकल्पात अंतर्भाव केला जात आहे. त्यानुसार, अर्थसंकल्प तयार करताना नागरिकांकडून सूचना मागविण्यात येतात. शहरातील विविध विकासकामे अधिक चांगल्या पध्दतीने व्हावीत, योजनांच्या अंमलबजावणीत नागरिकांचा सहभाग वाढावा आणि विकासकामांवर लक्ष असावे, अर्थसंकल्प लोकाभिमुख व्हावा, यादृष्टीने नागरिकांकडून अर्थसंकल्पासाठी सूचना मागविण्याचा उपक्रम महापालिकेकडून राबविला जात आहे.

या उपक्रमांतर्गत नागरिकांना आपापल्या परिसरातील एखादे काम अर्थसंकल्पात सूचवता येते. त्यासाठी सुचविलेल्या कामाचा खर्च दहा लाख रुपयापर्यंत असावा एवढीच एकमेव अट महापालिकेने घातली आहे. कचरा पेटीची व्यवस्था, पदपथ तयार करणे, रस्त्यांचे डांबरीकरण, दिवे लावणे, सिग्नल बसविणे, बसस्थानक उभारणे, सार्वजनिक शौचालय उभारणे, वृध्दांसाठी बैठक व्यवस्था करणे, बागा किंवा उद्यानातील सुधारणा आदी कामांबाबत नागरिक सूचना करु शकतात. योग्य सूचनांचा समावेश महापालिकेच्या अर्थसंकल्पात केला जातो.

यंदा देखील महापालिकेने नागरिकांना 22 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर 2021 पर्यंत कामे सुचविण्याचे आवाहन केले होते. एक महिन्याचा कालावधी दिला होता. तरीही त्याला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. आठ प्रभागातून केवळ 11 जणांनीच अर्थसंकल्पासाठी कामे सुचविली आहेत. या कामांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाणार आहे. त्यामध्ये ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतून 10 कामे सुचविण्यात आली होती. त्यापैकी 4 कामे स्वीकृत केली. तर, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयातून आलेले 1 काम स्वीकारण्यात आले, अशी एकूण 5 कामांच्या सूचना स्वीकारल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button