नकुल भोइर खून प्रकरणी पत्नीचा प्रियकरही अटकेत
१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी

पिंपरी चिंचवड : चिंचवड येथील नकुल भोईर यांच्या खुनप्रकरणात अटक करण्यात आलेल्या महिला आरोपी चैताली भोईर हिचा प्रियकर सिद्धार्थ दिपक पवार (वय २१, रा. बालाजी अपार्टमेंट, लिंकरोड, चिंचवड) याचा या खुनात सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्या दोघांनाही १ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
नकुल आनंदा भोईर (वय ४०, रा. माणिक कॉलनी, चिंचवड) यांचा खून त्यांची पत्नी चैत्राली हिने आपण एकटीने केल्याची माहिती तिनेच पोलिसांना फोन करून दिली. त्यानुसार पोलिसांनी तिला अटक केली. मात्र या प्रकरणात आणखी कोणीतरी सहभागी असावे, अशी शंका पोलिसांना होती. त्यानुसार पोलिसांनी तिचा प्रियकर सिद्धार्थ पवार याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र त्या दोघांनीही पोलिसांना काहीच माहिती दिली नाही. अखेर पोलिसांनी विविध फंडे वापरून आरोपी गुन्ह्याची उकल केली.
आरोपी सिद्धार्थ पवार हिचे आरोपीशी अनैतिक संबंध होते. या संबंधाच्या कारणावरून नकुल भोईर आणि पत्नी चैत्राली भोईर यांच्यात वादविवाह होत होते. आपल्या अनैतिक संबंधाच्या आड नकुल भोईर येत असल्याने त्या दोघांनीही नकुलचा काटा काढण्याचे ठरविले. त्यातच चैत्राली हिने अनेकांकडून कर्ज घेतल्याची माहितीही नकुल यांना समजली. त्या कारणावरून चैत्राली व नकुल यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. यावेळी नकुलने पत्नीला मारहाण केली. आपल्या प्रियसीला मारहाण झाल्याने सिद्धार्थ याचा राग अनावर झाला आणि दोघांनी संगनमताने ओढणीच्या साह्याने नकुलचा गळा दाबून खून केल्याचे उघड झाले.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमधील पत्रकार डॉ. विश्वास मोरे यांच्या ‘पाऊले तुकोबांची’ या ग्रंथास प्रथम क्रमांक!
चैत्राली हिने आपणच नकुल याचा गळा आवळला असल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र तपासात हे कृत्य चैत्राली आणि सिद्धार्थ या दोघांनी केल्याचे निष्पन्न झाले. ज्या ओढणीने नकुल यांचा गळा आवळला ती ओढणी सिद्धार्थ हा जाळून टाकणार होता. कारण त्या ओढणीला नकुल याचा घाम होता. मात्र चैत्राली हिने दुसरीच ओढणी पोलिसांना दाखविली. ज्या ओढणीने खून केला ती ओढणी लपवून ठेवली. आता तीच ओढणी जप्त करण्यासाठी चैत्राली हिला पोलीस कोठडी सुनावली.
आरोपी सिद्धार्थ आणि चैत्राली यांचे प्रेमसंबंध होते. ते कोणकोणत्या लॉजवर गेले याचा तपास करायचा असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. मात्र हे कागदी पुरावे असल्याचे त्यासाठी आरोपी सिद्धार्थ याच्या पोलीस कोठडीची गरज नाही. तसेच पोलीस चौकशीसाठी आरोपीला वारंवार पोलीस ठाण्यात बोलवत असल्याने पोलिसांना सर्व माहिती आहे. त्यामुळे पोलीस कोठडीची गरज नसल्याचे आरोपीचे वकील ॲड. सुनील कडूस्कर यांनी सांगितले. तर आरोपी सिद्धार्थ याच्या रक्ताचे नमुने घ्यायचे असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
त्या मध्यस्थाच्या नावाची चर्चा
आरोपी चैत्राली ही पोलिसांना तपासात मदत करीत नव्हती. त्यावेळी एका मध्यस्थाने चैत्रालीची भेट घेतली. त्या मध्यस्थाने चैत्राली हिला पोलिसांना सर्व खर सांगण्यास सांगितले. तू सिद्धार्थला जरी वाचविले तरी तू तुरूंगातून बाहेर आल्यावर तो तुला स्विकारेल का, असा सवालही त्या मध्यस्थाने केला. याचा सकारात्मक परिणाम चैत्राली हिच्यावर झाला आणि तिने तपासात पोलिसांना सहकार्य करू लागली. तो मध्यस्थ निवृत्त पोलीस असल्याचे समजते.




