PCMC | चौधरी पार्क, वाकड परिसरात मोकाट कुत्र्यांचा असह्य त्रास!
सौंदर्या सोसायटी, सॅन्टोसा एलिसियम, सुयोग स्पेससह परिसरातील सोसायट्यांचा एकजुटीने आवाज

वाकड, पिंपरी-चिंचवड | चौधरी पार्क, वाकड परिसरातील सौंदर्या सोसायटी, सॅन्टोसा एलिसियम, सुयोग स्पेस आणि इतर जवळच्या सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाविरोधात गंभीर चिंता व्यक्त केली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या कुत्र्यांच्या सतत भुंकण्यामुळे झोपेवर होत असलेला परिणाम नागरिकांना असह्य झाला आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून वाकड येथील अनेक सोसायट्यांमध्ये रात्रीच्या वेळी मोकाट कुत्र्यांचे टोळके गोळा होत असून, त्यांचे सततचे भुंकणे नागरिकांच्या झोपेवर गंभीर परिणाम करत आहे. लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदार वर्ग यांना यामुळे तणाव, थकवा आणि मानसिक अस्वस्थतेला सामोरे जावे लागत आहे.
ध्वनी प्रदूषण आणि आरोग्याचा धोका
रात्रभर चालणारे कुत्र्यांचे आवाज हे ध्वनी प्रदूषणाच्या श्रेणीत येतात. सततच्या त्रासामुळे अनेक नागरिक झोप न लागणे, झोपमोड आणि त्यामुळे होणाऱ्या शारीरिक-मानसिक त्रासांनी हैराण झाले आहेत. याशिवाय, कुत्रा चावण्याचा धोका आणि रेबीजसारख्या आजारांचा प्रादुर्भाव यामुळे आरोग्याच्या दृष्टीनेही मोठा धोका निर्माण झाला आहे.
हेही वाचा : Donald Trump | ‘भारतात आयफोन बनवू नका’; डोनाल्ड ट्रम्प यांचा अॅपलला इशारा
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संताप
‘सारथी’ अॅपवर वेळोवेळी तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांमध्ये महापालिका प्रशासनाविषयी नाराजी आणि असहायता व्यक्त होत आहे.
आमदार शंकर जगताप यांनी लक्ष घालावे – नागरिकांची मागणी
परिसरातील नागरिकांनी भाजपाचे आमदार श्री. शंकर जगताप यांच्याकडेही यामध्ये लक्ष घालण्याची मागणी केली आहे. आमदारांनी या गंभीर समस्येची दखल घेऊन महापालिका प्रशासनावर दबाव आणावा, अशी मागणी होत आहे.
आयुक्त शेखर सिंह यांनी त्वरित कारवाई करावी
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्री. शेखर सिंह यांना वाकड परिसरातील या वाढत्या समस्येकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी खालील मागण्या मांडल्या आहेत:
1. मोकाट कुत्र्यांचे नियंत्रणासाठी विशेष मोहिम हाती घ्यावी.
2. कुत्र्यांचे लसीकरण व पुनर्वसन तत्काळ सुरू करावे.
3. रात्रीच्या वेळी गस्त वाढवून ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात.
4. सारथी अॅपवरील तक्रारींची कार्यवाही वेळेत व पारदर्शकपणे व्हावी.