अक्षय कुमारच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया; कामातून घेणार ब्रेक

Akshay kumar : बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अभिनेता अक्षय कुमार सध्या ‘भूत बंगला’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तो बऱ्याच वर्षांनंतर दिग्दर्शन प्रियदर्शनसोबत काम करत आहे. ही जोडी पुन्हा एकदा यशस्वी ठरली असून ‘भूत बंगला’ला थिएटरमध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय. वर्षातून तीन ते चार चित्रपटांमध्ये काम करणारा अक्षय लगेचच अनीस बाज्मीच्या आगामी चित्रपटासाठी शूटिंगला सुरुवात करणार होता. परंतु त्यापूर्वी त्याने कामातून छोटासा ब्रेक घेतला आहे. अक्षय कुमारच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करावी लागल्याने त्याला कामातून काही काळ ब्रेक घ्यावा लागला आहे.
‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, अक्षय कुमारच्या डोळ्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 6 मे रोजी ही सर्जरी झाली असून त्यानंतर डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा आणि अतिप्रकाशात न जाण्याचा सल्ला दिला आहे. व्हिजन करेक्शनसाठी ही सर्जरी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अक्षय आता कामातून ब्रेक घेणार असून काही दिवसांनंतर तो शूटिंगला परतणार आहे. आगामी चित्रपटात तो विद्या बालन आणि राशी खन्ना यांच्यासोबत भूमिका साकारणार आहे.
ताज्या वृत्तानुसार, अक्षय कुमारला गेल्या काही काळापासून दृष्टीशी संबंधित काही किरकोळ समस्या जाणवत होत्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, बुधवारी त्याने व्हिजन करेक्शनची सर्जरी करून घेतली. ही एक सामान्य वैद्यकीय प्रक्रिया होती, जी पूर्णपणे यशस्वी ठरली. शस्त्रक्रियेनंतर अक्षय बरा होत असून डॉक्टरांनी त्याला डोळ्यांवर ताण न देण्याचा आणि काही दिवस पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.
हेही वाचा – इचलकरंजीतील इंदिरा गांधी रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होणार
6 मे रोजी डोळ्यांची शस्त्रक्रिया होण्याच्या काही तासांपूर्वी अक्षयने ‘केरळम’ या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं होतं. आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर सेटवरील एक फोटो शेअर करत अक्षयने लिहिलं होतं, ‘केरळचं शेड्युल पूर्ण झालं आहे. एका सुंदर ठिकाणी, उत्तम लोकांसोबत काम करण्यापेक्षा अधिक आनंददायी काहीही नाही. कॅमेरामागे अविश्वसनीय ऊर्जा देणाऱ्या आमचे दिग्दर्शक अनीस बाझमी यांचे खूप खूप आभार. माझे सहकलाकार विद्या बालन, राशी खन्ना, राजपाल यादव आणि संपूर्ण टीमचे मनापासून आभार. हा प्रोजेक्ट माझ्यासाठी खूप खास होता.’
अक्षय कुमार हा बॉलिवूडमध्ये दरवर्षी सर्वाधिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी ओळखला जातो. सध्या त्याचा ‘भूत बंगला’ हा चित्रपट थिएटरमध्ये दमदार कमाई करतोय. याशिवाय ‘वेलकम टू द जंगल’, ‘हैवान’, ‘केरळम’, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’, ‘गोलमाल 5’ हे त्याचे आगामी चित्रपट आहेत.





