झाड अंगावर पडून आकुर्डीत दोन तरूण जखमी
स्थानिक नागरिकांनी त्वरीत रूग्णालयात केले दाखल

पिंपरी चिंचवड : झाडाखाली दुचाकीवर गप्पा मारत बसलेल्या दोन तरूणांच्या अंगावर कुजलेले झाड अचानक कोसळून पडल्याने दोन तरूण जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी त्वरीत त्यांची सुटका करून रूग्णालयात नेले. ही घटना आकुर्डी येथे भाजी मंडईजवळ विठ्ठल मंदीरासमोर सोमवारी (दि. १९) दुपारी अडीचच्या सुमारास घडली.
अमन खान (वय २२, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) आणि साहिल खान (वय २४, रा. पंचतारानगर, आकुर्डी) अशी जखमींची नावे आहेत. आकुर्डी भाजी मंडईजवळ एक
मोठे कुजलेले झाड आहे. सोमवारी दुपारी या झाडाखाली अमन आणि साहिल हे दोघे एका दुचाकीवर बसून गप्पा मारत होते. यावेळी अचानक कुजलेले झाड मुळासह उन्मळून पडले. झाडाच्या फांद्या अमन आणि साहिलच्या अंगावर पडल्याने दोघेही झाडाखाली अडकले.
हेही वाचा – Women’s health policies : गर्भवती महिलांसाठी उष्णतेचा धोका वाढला !
स्थानिक रहिवाशांनी फांद्या बाजूला करीत दोघांची सुटका केली. जखमी अवस्थेतील दोघांना तातडीने लगतच्या रूग्णालयात हलविण्यात आले. या झाडामुळे रस्त्याकडेच्या एका रसवंती गृहाचेही नुकसान झाले. दरम्यान, भलेमोठे झाड रस्त्यात पडल्याने आकुर्डी येथील वाहतुकीचा खोळंबा झाला. झाड पडल्याची वर्दी मिळताच महापालिकेच्या प्राधिकरण
अग्निशमन केंद्रातील रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली. झाडाच्या फांद्या कापून झाड रस्त्याच्या बाजूला करण्यात आले. त्यानंतर वाहतुक सुरळीत झाली.