पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी (अजित पवार गट) मधून भाजपमध्ये प्रवेशांची मालिका कायम
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची संघटनात्मक ताकद वाढत, राष्ट्रवादीला मोठा धक्का

पिंपरी-चिंचवड | पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश सुरूच असून, शहरातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहेत. या घडामोडींमुळे भाजपची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम होत असून राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसत असल्याचे चित्र आहे.
मागील आठवड्यात भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार पैलवान महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजप प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) मधील २२ माजी नगरसेवकांनी हजारो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. या प्रवेशामुळे शहरातील राजकारणात खळबळ उडाली असून, भाजपचा प्रभाव वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिघी परिसरातही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. दिघी गावातील ज्येष्ठ नेतृत्व म्हणून ओळख असलेले श्री. दत्तात्रय आबा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सातत्याने विकासकामांच्या माध्यमातून जनतेचा विश्वास संपादन केला आहे. परिणामी, या प्रभागातून भाजपचे चारही उमेदवार निवडून येण्याची परंपरा आजवर कायम राहिली आहे.
हेही वाचा : मतदान जागृतीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचा अभिनव उपक्रम
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील माजी पदाधिकारी व युवकांमध्ये प्रभाव असलेले श्री. अमोल देवकर (पिंपरी-चिंचवड शहर सरचिटणीस), तसेच श्री. अभिजीत घोलप (रा.कॉ. पदवीधर संघ, भोसरी विधानसभा अध्यक्ष) आणि स्वप्नील दळवी (प्रभाग अध्यक्ष, युवामोर्चा राष्ट्रवादी) यांनी आज आमदार श्री. महेशदादा लांडगे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला.
हा प्रवेश भाजपचे युवा नेते श्री. कार्तिक लांडगे यांच्या पुढाकारातून घडून आल्याने युवक वर्गामध्ये भाजपप्रती उत्साह आणि विश्वास अधिक दृढ झाल्याचे दिसून येत आहे. तसेच सामाजिक कार्यात सक्रिय असलेले व युवा नेतृत्व म्हणून शहरभर ओळख निर्माण केलेले श्री. उदय दत्तात्रय गायकवाड यांच्या कार्याचीही विशेष दखल घेतली जात असून, दिघी–बोपखेल प्रभागात भाजपची स्थिती आणखी मजबूत होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
दरम्यान, नवीन, ऊर्जावान आणि जनतेशी थेट संपर्क असलेल्या नेतृत्वाला संधी देण्याची भाजपची रणनीती यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे भाजप निवडणूक प्रमुख आमदार श्री. शंकर जगताप यांनीही यंदाच्या निवडणुकीसाठी “अबकी बार १०० नहीं, १२५ पार” असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.




