पीएमपीएमएल सेवकांमध्ये स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदान जागृती मोहीम
आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
हडपसर : पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथील निवडणूक कार्यालयाच्यावतीने पद्धतशीर मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभाग (स्वीप) कार्यक्रमांतर्गत प्रभागातील पीएमपील सेवकांमध्ये “मतदान जागृती मोहीम’ राबवण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी गणेश मरकड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रवी खंदारे व सुनील पाटील यांनी हडपसर गाडीतळ पीएमपील आगार मधील सर्व सेवकांनी मतदान करण्याची शपथ यावेळी दिली.
हडपसर पीएमपीचे आगार व्यवस्थापक अल्ताफ सय्यद, हडपसर स्वीप टीमचे प्रज्ञा तांबे, संजीव परदेशी, माधुरी नाझीरकर, रचना कांबळे, सोनाली घोडके, अनुराधा चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते. उपस्थित सेवकांना यावेळी मतदान प्रक्रियेची संपूर्ण माहिती देण्यात आली. आगामी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहनही करण्यात आले.
“आम्ही प्रत्येक नागरिकाचा मतदान हक्क सन्मानित करीत आहोत. आपला लोकप्रतिनिधी निवडण्याची ही संधी महत्वपूर्ण आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराने सकारात्मक राहून आपला मतदानाचा हक्क पूर्ण करावा.”
गणेश मरकड (निवडणूक निर्णय अधिकारी)




