ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील दानपेटीवर सेवेकऱ्यानेच टाकला दरोडा; १५ हजारांची रोकड लंपास

आळंदी | संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरातील दानपेटीतून खुद्द मंदिराच्या सेवेकऱ्यानेच रोकड लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विशाल बाळू वारूळे या संशयित सेवेकऱ्यावर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी या संदर्भात पोलिसांत अधिकृत फिर्याद दिली आहे.

या घटनेमुळे आळंदीत आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या लाखो भाविकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून मंदिरातील सुरक्षाव्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२, १३ आणि १६ मे २०२६ रोजी सायंकाळच्या वेळी दानपेटीतील भाविकांनी अर्पण केलेली रक्कम कॅशियरकडे जमा करण्याची जबाबदारी संबंधित सेवेकऱ्यावर सोपवण्यात आली होती. दानपेटीतील हे पैसे बकेटमध्ये भरत असताना, आरोपीने आजूबाजूच्या लोकांची नजर चुकवून संधी साधली. त्याने दानपेटीतील रोकड गुपचूप स्वतःच्या पिशवीत टाकली.

हेही वाचा

बाणेर-बालेवाडीतील वाढत्या वीज समस्यांवर चंद्रकांत पाटील आक्रमक

संस्थान प्रशासनाला संशय आल्यानंतर मंदिरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासण्यात आले आणि अंतर्गत चौकशी करण्यात आली. यामध्ये संबंधित सेवेकऱ्याचे हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झाल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. प्राथमिक तपासात या सेवेकऱ्याने तीन दिवसांत मिळून एकूण १५ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचे निष्पन्न झाले आहे.

भाविकांमध्ये संताप; प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

माऊलींच्या समाधी मंदिर परिसरात यापूर्वीही पैसे चोरीच्या काही घटना घडल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. अशा घटना वारंवार घडूनही मंदिर प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस व कठोर पावले उचलली नसल्याने स्थानिक नागरिकांनी आणि भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मंदिरातील दानपेट्यांची मोजणी प्रक्रिया, सीसीटीव्हीद्वारे ठेवली जाणारी देखरेख आणि तेथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवरील नियंत्रण यामध्ये गंभीर त्रुटी असल्याचा थेट आरोप आता केला जात आहे. याप्रकरणी आळंदी पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button