लडाखमध्ये भारतीय लष्कराचे ‘चिता’ हेलिकॉप्टर कोसळले; ३ वरिष्ठ अधिकारी थोडक्यात बचावले

Leh Helicopter Crash | लडाखमधील लेहजवळील तांगस्ते भागात भारतीय लष्कराचे ‘चिता’ हेलिकॉप्टर कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातातून हेलिकॉप्टरमधील तिन्ही वरिष्ठ लष्करी अधिकारी थोडक्यात आणि सुखरूप बचावले आहेत. त्यांना केवळ किरकोळ दुखापत झाली असल्याची माहिती समोर आली असून, या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल सचिन मेहता, एका लेफ्टनंट कर्नल आणि एका मेजर दर्जाच्या अधिकाऱ्यासह तीन वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते. अपघातानंतर तातडीने मदत कार्य राबवून या तिघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
हेही वाचा
चीनमध्ये कोळशाच्या खाणीत भीषण गॅस स्फोट; ८२ कामगारांचा मृत्यू, ९ जण अजूनही बेपत्ता
अपघातानंतरचा सेल्फी व्हायरल
या भीषण अपघातानंतर घटनास्थळावरून एक अत्यंत कौतुकास्पद आणि वेगळा फोटो समोर आला आहे. लष्कराचे ‘चिता’ हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर, थेट अपघातग्रस्त विमानाजवळच दोन सहकाऱ्यांसोबत बसलेल्या मेजर जनरल सचिन मेहता यांचा एक सेल्फी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जीवघेण्या संकटातून सुखरूप बचाय झाल्यानंतर लष्करी अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरील हे धैर्य आणि सकारात्मकता सध्या नेटीझन्समध्ये चर्चेचा विषय बनली आहे. या संदर्भातील वृत्त ‘एएनआय’ (ANI) या वृत्तसंस्थेने दिले आहे.
अपघाताच्या सखोल चौकशीचे आदेश
तांगस्ते परिसरातील या हेलिकॉप्टर अपघाताची गंभीर दखल घेत भारतीय लष्कराने या घटनेच्या अधिकृत चौकशीचे आदेश दिले आहेत. हा अपघात नेमका तांत्रिक बिघाडामुळे झाला की लडाखमधील खराब हवामानामुळे, यासह सर्व संभाव्य बाजूंची आणि तांत्रिक कारणांची कसून तपासणी केली जाणार आहे.





