Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये ७५ हजार पदवीधर नोंदणी आणि ५ हजार रक्तदानाचे ‘‘लक्ष्य’’

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश

शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्त्वात संघटनात्मक कामाला वेग

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

“पदवीधर मतदार नोंदणी आणि रक्तदान ही केवळ मोहीम नसून, ती पक्षाच्या संघटनशक्तीची खरी परीक्षा आहे. पिंपरी-चिंचवडने राज्यात आदर्श निर्माण करावा,” असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी केले. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी कासारवाडी येथील हॉटेल कलासागर येथे भाजपची पिंपरी-चिंचवड जिल्हा महाबैठक उत्साहात पार पडली.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, पदवीधर मतदार नोंदणी मोहीम आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या रक्तदान अभियानाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. यावेळी रवींद्र चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश दिले.

पिंपरी-चिंचवड शहरात किमान ७५ हजार पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून, प्रत्येक नगरसेवकाने किमान ५०० पदवीधरांची नोंदणी करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. नोंदणीसोबतच आवश्यक कागदपत्रांच्या हार्ड कॉपी वेळेत जमा करण्याची जबाबदारीही संबंधित पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. या मोहिमेचा दररोज आढावा घेण्यासाठी स्वतंत्र चार्ट तयार करून तो जिल्हाध्यक्ष व गटनेत्यांकडे सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

“२० ऑगस्टपर्यंत पदवीधर नोंदणी मोहीम शंभर टक्के पूर्ण झाली पाहिजे. संघटनासाठी काम करणाऱ्यांनाच भविष्यातील संधी मिळतील,” असा स्पष्ट संदेश देत चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना सक्रिय होण्याचे आवाहन केले.

हेही वाचा

झुरिचमध्ये भारताचा तिरंगा फडकला; समिप्ता वाव्हळने पटकावला रौप्यपदक

देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात एक लाख रक्तदानाचा संकल्प भाजपने केला असून, त्यामध्ये पिंपरी-चिंचवडने किमान पाच हजार रक्तदाते उभे करावेत, असे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. “मोठे फ्लेक्स आणि जाहिरातींवर खर्च करण्यापेक्षा रक्तदानासारख्या समाजोपयोगी उपक्रमातून जनतेशी नाळ जोडावी,” असेही त्यांनी सांगितले.

यावेळी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांनी संघटनात्मक कामाचा आढावा घेतला. बीएलए-२चे काम पूर्ण झाले असले, तरी मतदार मॅपिंगची गती वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. पुढील १८ दिवसांत हे काम पूर्ण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने मैदानात उतरावे, असे आवाहन त्यांनी केले.

महाबैठकीस प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे, आ. महेशदादा लांडगे, आ. उमाताई खापरे, आ. शंकरशेठ जगताप, आ. अमित गोरखे, संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, सरचिटणीस विकास डोळस, मधुकर बच्चे, वैशाली खाडे, पक्षनेते प्रशांत शितोळे, उपमहापौर शर्मिला बाबर, अभिषेक बारणे, राजेश पिल्ले, दिनेश यादव यांच्यासह सर्व पदाधिकारी, मंडलाध्यक्ष, मोर्चा व आघाडीचे पदाधिकारी, बीएलए-१ आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

बैठकीचे प्रास्ताविक शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी केले. सूत्रसंचालन संघटन सरचिटणीस मोरेश्वर शेडगे यांनी, तर आभार प्रदर्शन सरचिटणीस विकास डोळस यांनी केले.

“भाजपची ताकद ही कार्यकर्त्यांच्या समर्पणात आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी दिलेले ७५ हजार पदवीधर नोंदणी आणि ५ हजार रक्तदानाचे उद्दिष्ट आम्ही केवळ पूर्णच करणार नाही, तर त्याही पुढे जाऊन राज्यात पिंपरी-चिंचवडचा आदर्श निर्माण करू. प्रत्येक मंडल, प्रत्येक बूथ आणि प्रत्येक कार्यकर्ता या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवेल, याची आम्हाला खात्री आहे.”

– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button