गणेशोत्सवाच्या काळात शहरातील जलतरण तलाव राहणार बंद
पिंपरी : क्रीडा विभागाकडील सर्व व्यवस्थापक, सुरक्षा अधिकारी तसेच जीवरक्षक व इतर सुरक्षा कर्मचारी यांची सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कामकाजासाठी ७ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत गणेश विसर्जन घाटांवर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात आलेली असल्याने शहरातील सर्व जलतरण तलाव या कालावधीत बंद राहणार असल्याची माहिती क्रीडा विभागाचे सहाय्यक आयुक्त पंकज पाटील यांनी दिली आहे.
महापालिकेच्या वतीने येत्या गणेशोत्सवाच्या अनुषंगाने सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय असणाऱ्या विघटन केंद्र, विसर्जन घाटांवर अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून मुर्ती संकलनासाठी तसेच इतर कामकाजासाठी सुमारे ६४० वाहने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. महापालिका हद्दीत सुमारे ८५ विसर्जन घाट आहेत. त्यामध्ये अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह क्षेत्रीय कार्यालयनिहाय अनुक्रमे १५, १४, ५, १३, १२, १०, ६, १० इतके विसर्जन घाट आहेत. या विसर्जन घाटांवर महापालिकेच्या वतीने विसर्जनाच्या दिवशी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून या सुविधांची पुर्तता करण्यासाठी समन्वय अधिकारी, कर्मचारी तसेच विसर्जनाच्या दिवशी अनुचित प्रकार घडू नये यासाठी जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाचा मालमत्ता ड्रोन सर्वेक्षणाचा निर्णय ठरला ‘माईलस्टोन’!
घरगुती गणपतीचे आणि गौरीचे विसर्जन शक्यतो घरी करण्यावर भर द्यावा किंवा मुर्तीदानास प्राधान्य द्यावे. गणेश मंडळांनी गणेश मूर्तींचे विधीवत विसर्जन मंडपालगत (कृत्रिम हौदामध्ये) करण्यास प्राधान्य द्यावे. गणेश विसर्जनाच्या दिवशी (दिड दिवस, पाच दिवस, सात दिवस, नऊ दिवस व दहा दिवस) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांमार्फत मूर्ती व निर्माल्य संकलनाकरीता फुलांनी सजवलेला सुशोभिकरण रथ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागामध्ये मूर्ती संकलन केंद्र उपलब्ध असणार आहेत. तसेच या केंद्रांवर मूर्ती विसर्जन करण्याकरीता नेण्यासाठी वाहने उपलब्ध असणार आहेत. श्रींच्या विसर्जनाकरीता प्रत्येकी २ कन्वेअर बेल्ट एका विसर्जन ठिकाणांवर उपलब्ध असतील. आवश्यकता भासल्यास अधिकचे कन्वेअर बेल्ट उपलब्ध करून देण्यात येतील. प्रत्येक प्रभागातील सुशोभित रथाच्या मूर्ती संकलनासाठी मार्गक्रमणिका प्रसिद्ध करण्यात येणार असून त्यानुसार नागरिकांनी व मंडळांनी गणेशमूर्तीं दान कराव्यात. तसेच निर्माल्य स्विकारण्यासाठी ठेवण्यात आलेल्या वाहनात निर्माल्य देऊन सहकार्य करावे. महानगरपालिकेद्वारे संकलित केलेल्या गणेशमूर्तींचे विधीवत रित्या व पावित्र्य राखून विसर्जन करण्यात येईल, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.