Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

तामिळनाडूत राजकीय भूकंप! अण्णा द्रमुकमध्ये मोठी फूट; बंडखोर गट मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारमध्ये सामील होणार

AIADMK Split | तामिळनाडूच्या राजकारणात मंगळवारी एक अत्यंत मोठी आणि अनपेक्षित उलथापालथ पाहायला मिळाली. अण्णा द्रमुकच्या दिवंगत नेत्या जे. जयललिता यांच्या निधनानंतर पक्षात गेली अनेक वर्षे धुमसणारी फूट आता उघड झाली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते एस. पी. वेुलमणी आणि सी. व्ही. षण्मुगम यांच्या नेतृत्वाखालील एका मोठ्या गटाने मुख्यमंत्री विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असून हा गट आजच मंत्रिमंडळात सामील होणार आहे.

विशेष म्हणजे आज अण्णा द्रमुकचे सरचिटणीस आणि माजी मुख्यमंत्री एडप्पाडी के. पलानीस्वामी (ईपीएस) यांचा ७२ वा वाढदिवस आहे. मात्र याच दिवशी त्यांच्या हातातील पक्षाचे नियंत्रण निसटल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बदललेल्या राजकीय परिस्थितीत हा मोठा निर्णय घेतल्याचे माजी कायदा मंत्री सी. व्ही. षण्मुगम यांनी चेन्नई येथील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे दिग्गज नेते एस. पी. वेुलमणी, सी. विजयभास्कर आणि आर. कामराज उपस्थित होते.

सी. व्ही. षण्मुगम यांनी एडप्पाडी के. पलानीस्वामी यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. पलानीस्वामी हे पक्षाचा पारंपरिक कट्टर विरोधक असलेल्या द्रमुकच्या (DMK) मदतीने सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा षण्मुगम यांनी केला आहे. ईपीएस यांच्या राजकीय कारकिर्दीतील हा सर्वात कठीण दिवस असल्याची भावना बंडखोर गटातील नेत्यांनी व्यक्त केली आहे. ओ. पन्नीरसेल्वम यांना ज्याप्रमाणे ईपीएस यांनी बाजूला केले होते, आता ईपीएस यांची अवस्थाही तशीच होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

हेही वाचा

एसटीचा कायापालट! पीपीपी तत्त्वावर राज्यभरात २०० चार्जिंग स्टेशन उभारणार

लॉरी किंगच्या कुटुंबाची किंगमेकरची भूमिका

या सर्व राजकीय नाट्यामागे लॉटरी किंग सँटियागो मार्टिन यांच्या पत्नी लीमा रोझ मार्टिन यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. निवडणुकीपूर्वी अण्णा द्रमुकमध्ये प्रवेश केलेल्या लीमा रोझ यांचे जावई आधाव अर्जुन हे मुख्यमंत्री विजय यांच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. लीमा रोझ यांनीच टीव्हीके आणि अण्णा द्रमुकच्या बंडखोर गटात मध्यस्थी करून हा संवाद घडवून आणला आहे. ५ मे रोजीच त्यांनी अशा वाटाघाटींचे संकेत दिले होते जे आता प्रत्यक्षात आले आहेत.

सत्ता समीकरणावर होणारा परिणाम

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अण्णा द्रमुकला ४७ जागा मिळाल्या होत्या. आता त्यातील मोठा हिस्सा या बंडखोर गटाकडे जाण्याची शक्यता आहे. हा बंडखोर गट आज सायंकाळी मुख्यमंत्री विजय यांची भेट घेणार असून मुख्यमंत्री विजय यांनी देखील सरकारी स्थैर्यासाठी या गटाचा पाठिंबा स्वीकारण्याचे संकेत दिले आहेत. या फुटीमुळे तामिळनाडूच्या राजकारणात अण्णा द्रमुकचे अस्तित्व आणि भवितव्य यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button