ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भटक्या कुत्र्यांचा उपद्रव; उपाययोजना करा!

महापालिका प्रशासनाला नगरसेविका अनिता काटे यांची मागणी

पिंपरी-चिंचवड | पिंपळे सौदागर प्रभाग क्रमांक २८ मध्ये भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव हा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर धोका ठरत असल्याचा मुद्दा उपस्थित करत नगरसेविका अनिता संदीप काटे यांनी प्रशासनाविरोधात ठाम भूमिका घेतली आहे. त्यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल करत तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

काटे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, प्रभागात भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी शाळेत जाणारी मुले, फिरायला बाहेर पडणारे ज्येष्ठ नागरिक आणि रात्री उशिरा घरी परतणाऱ्या महिलांना कुत्र्यांच्या टोळ्यांचा सामना करावा लागत आहे. काही भागांत कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनाही घडल्याची माहिती त्यांनी प्रशासनाला दिली आहे.

अनिता काटे यांनी यापूर्वीही पशुवैद्यकीय विभागाशी लेखी तसेच दूरध्वनीद्वारे वारंवार संपर्क साधून निर्बिजीकरण व लसीकरण मोहिम राबवण्याची मागणी केली होती. मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणताही ठोस प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “नागरिक वारंवार तक्रारी करत आहेत, परंतु विभागाकडून प्रतिसादच मिळत नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे,” असे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा        :            पिंपळे सौदागर येथे भाजपाची ‘टिफिन पे चर्चा’ उत्साहात    

जबाबदारी निश्चित करण्याची मागणी…

काटे यांनी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून तात्काळ उपाययोजना राबवाव्यात, अशी स्पष्ट मागणी केली आहे. भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरण, लसीकरण आणि पुनर्वसनासाठी ठोस कृती आराखडा जाहीर करण्याचीही त्यांनी सूचना केली आहे. तसेच, समस्या केवळ तक्रारींवर मर्यादित न ठेवता दीर्घकालीन नियोजनाद्वारे सोडवणे आवश्यक आहे. यामध्ये व्यापक निर्बिजीकरण मोहीम, नियमित लसीकरण, नागरिकांसाठी हेल्पलाईनची प्रभावी अंमलबजावणी, तक्रारींवर त्वरित प्रतिसाद देणारी विशेष पथकेअशी उपाययोजना तातडीने राबवावी, अन्यथा नागरिकांचा रोष वाढण्याची शक्यता असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

नागरिकांच्या पाठिंब्याने लढा

प्रभागातील अनेक नागरिकांनीही काटे यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला असून, प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे अनिता काटे यांनी स्पष्ट केले आहे. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणात नगरसेविका अनिता काटे यांनी घेतलेली आक्रमक भूमिका ही प्रशासनासाठी जागे करणारी ठरत आहे. आता महापालिका प्रशासन कोणती पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पिंपळे सौदागर प्रभागातील भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव हा केवळ तक्रारींचा विषय नाही, तर नागरिकांच्या सुरक्षिततेशी थेट संबंधित गंभीर प्रश्न आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित विभागाने तात्काळ निर्बिजीकरण व लसीकरण मोहीम राबवून ठोस कृती आराखडा जाहीर करावा. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करू नये; अन्यथा नागरिकांच्या हक्कासाठी आम्ही अधिक तीव्र भूमिका घेऊ.

– अनिता काटे, नगरसेविका.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button