पिंपळे सौदागर येथे भाजपाची ‘टिफिन पे चर्चा’ उत्साहात
संघटनात्मक उपक्रम: शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचा संवादावर भर!

पिंपरी-चिंचवड | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रेरित ‘टिफिन पे चर्चा’ या उपक्रमाचे आयोजन पिंपळे सौदागर येथे उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमात भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत संघटनात्मक बळकटीचा संदेश दिला.
या बैठकीस नगरसेविका कुंदाताई भिसे, नगरसेविका अनिताताई काटे, श्री जयनाथ शेठ काटे, श्री मनोजराव ब्राम्हणकर तसेच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपक्रमांतर्गत सर्वांनी आपापले घरचे डबे एकत्र आणून सामूहिक भोजन केले. अनौपचारिक वातावरणात झालेल्या चर्चेमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोकळेपणाने संवाद साधता आला. परिसरातील विकासकामे, नागरिकांच्या मूलभूत सुविधा, विविध शासकीय योजना तसेच आगामी उपक्रम यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

हेही वाचा : ‘‘पाणीबाणी’’ टाळण्यासाठी उपाययोजना!
यावेळी शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले की, “‘टिफिन पे चर्चा’ ही संकल्पना कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये थेट संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम आहे. एकत्र बसून घरचा डबा शेअर करताना निर्माण होणारे आपुलकीचे वातावरण संघटनात्मक बळकटीसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. या उपक्रमामुळे पदानुसार असलेला भेद कमी होऊन समानता आणि एकतेची भावना दृढ होते. नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचनांची अचूक माहिती मिळविण्यास अशा संवादातून मोठी मदत होते.”
त्यांनी पुढे सांगितले की, संघटन मजबूत करण्यासाठी आणि लोकांशी थेट संपर्क वाढवण्यासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येईल. समाजहितासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याची प्रेरणा या माध्यमातून मिळते, असेही त्यांनी नमूद केले. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या ‘टिफिन पे चर्चा’ उपक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढला असून स्थानिक पातळीवर संघटन अधिक मजबूत करण्यास निश्चितच हातभार लागणार आहे.
भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांच्या बळावर उभा असलेला पक्ष आहे. संघटनात्मक बांधणी मजबूत असेल तर कोणतेही उद्दिष्ट साध्य करणे शक्य होते. प्रत्येक बूथ स्तरापर्यंत पक्षाची रचना सक्षम करण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. संघटित, शिस्तबद्ध आणि समाजाभिमुख कार्यपद्धतीमुळेच भाजपा जनतेचा विश्वास संपादन करू शकली आहे. आगामी काळातही अधिक सक्षम संघटन उभारून जनसेवा अधिक प्रभावीपणे करू.
– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.




