कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी थेरगाव रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करा – नगरसेविका अर्चना बारणे

पिंपरी / महाईन्यूज
कोविड 19 रुग्णांसाठी थेरगाव रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात यावे. त्यामध्ये 100 ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड 30 एवढे असावेत. कारण, या रुग्णालयावर थेरगाव, वाकड, ताथवडे, पुनावळे, किवळे, चिंचवड भागाचा ताण पडणार आहे. त्यामुळे अंतर्गत यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे, अशी मागणी नगरसेविका अर्चना बारणे यांनी केली आहे.
यासंदर्भात बारणे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, कोविड 19 चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी ती अटोक्यात आणण्यासाठी पालिकेने नव्याने उभे केलेले थेरगाव रुग्णालय सुरू करण्याच्या प्रशासनाच्या हालचाली आहेत. नागरिकांना कोरोना विषाणुच्या महामारीतून बाहेर काढण्यासाठी हे रुग्णालय सुरू होणे गरजेचे आहे. परंतु, ते पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात यावे.
थेरगाव रुग्णालयातील आयसोलेशन बेड व ऑक्सिन बेडची संख्या 100 असावी. व्हेंटिलेटर बेडची संख्या 25 ते 30 असावी. कारण, हे रुग्णालय मध्यवर्ती भागात असल्यामुळे त्यावर थेरगाव, वाकड, ताथवडे, पुनावळे, किवळे, चिंचवड भागातील नागरिकांचा ताण पडणार आहे. त्यामुळे जास्तीजास्त बेड उपलब्ध करून दिले तर भविष्यात बेडविना रुग्णाला अन्य ठिकाणी जाण्याची वेळ येणार नाही. तशी सक्षम व्यवस्था याठिकाणी करण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका बारणे यांनी केली आहे.





