अग्निसुरक्षा प्रमाणपत्राबाबतच्या शिबिरास व्यवसायधारकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागामार्फत महानगरपालिका हद्दीतील चिखली, कुडळवाडी व तळवडे परिसरातील व्यावसायिक मालमत्ताधारकांना ‘अग्निसुरक्षितता पूर्तता प्रमाणपत्र’ प्राप्त करून घेण्याची प्रक्रिया व आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यासाठी चिखली, सोनवणे वस्ती येथील ‘टाऊन हॉल’ येथे मार्गदर्शन शिबिर पार पडले. याप्रसंगी अग्निशमन विभागाचे उपायुक्त, मनोज लोणकर, उप अग्निशमन अधिकारी बाळासाहेब वैद्य यांनी व्यावसायिकांना मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन शिबिरामध्ये व्यावसायिक मालमत्ताधारकांना ‘अग्निसुरक्षितता पूर्तता प्रमाणपत्र’ प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांबाबत माहिती देण्यात आली. त्याचबरोबर, शिबिरामध्ये व्यावसायिक मालमत्ताधारकांच्या अडचणींचा तत्काळ निरसन करण्यात आले. व्यावसायिक मालमत्ताधारकांना अग्निशमन उपकरणे हाताळण्याची पद्धती, व्यावसायिक मालमत्ता अग्निसुरक्षेच्या दृष्टीने पूर्ण सुरक्षित करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची व यंत्रणांची इत्थंभूत माहिती देण्यात आली.
हेही वाचा – विदर्भातील मुद्द्यावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर; भाजप नेते आशिष देशमुख यांचा आरोप
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाकडून शहरातील मालमत्तांच्या सुरक्षेसाठी अग्निप्रतिबंधात्मक व जीवसंरक्षक सर्वेक्षण करण्यात येत आहे. यामध्ये, मनपा क्षेत्रातील व्यावसायिक, औद्योगिक, शैक्षणिक, संस्थात्मक व वैद्यकीय इमारतींचे अग्निप्रतिबंधात्मक सर्वेक्षण झालेल्या मिळकतीपैंकी धोकादायक मिळकतींची ओळख पटवून मिळकतीमध्ये अग्निशमन यंत्रणांची उपलब्धता, ये-जा करण्याचा सुरक्षित मार्ग, धोकादायक पदार्थांचा साठा, मिळकतीमध्ये निवासी वास्तव्य इत्यादी बाबींचा विचार करून शहरात अग्निप्रतिबंधात्मक व जीवसंरक्षक सर्वेक्षण सुरू आहे. शहरातील व्यावसायिक मालमत्ताधारकांना आपली मालमत्ता अग्निसुरक्षित करण्यासाठी अटींची पूर्तता करणे गरजेचे आहे. ज्यांनी अद्यापि पूर्तता केली नाही, अशा 5093 मालमत्ताधारकांना नोटिस बजाविण्यात आली आहे. यापैकी, 970 मालमत्ताधारकांची प्रकरणे विभागामध्ये आली आहेत. यामधून 429 मालमत्तांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली असून 313 मालमत्तांची प्रकरणे व्यावसायिक अग्निसुरक्षा प्रमाणपत्राकरिता प्रक्रियेत आहेत. याबरोबरच, आतापर्यंत 92 व्यावसायिक मालमत्ताधारकांना ‘अग्निसुरक्षितता पूर्तता प्रमाणपत्र’ प्रदान करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील व्यावसायिक मालमत्ताधारकांना दोन वेळा नोटिस बजाविल्यानंतरही 37 व्यावसायिक मालमत्ताधारकांनी अग्निप्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन न केल्याने त्या मालमत्ता सिलबंद करण्यात आल्या आहेत.





