पिंपरी-चिंचवडमध्ये गणेश मूर्तींचे संकलनात सामाजिक संस्थांचा पुढाकार!
विधायक उपक्रम: सामाजिक संस्थांचा विसर्जन घाटावर उत्स्फूर्त सहभाग
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्था, दिलासा संस्था, बेसिक टीम आणि ड प्रभाग आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे गुरव येथील गणेश विसर्जन घाटावर मोठ्या उत्स्फूर्ततेने मूर्ती संकलनाचे कार्य पार पडले. या उपक्रमात एकूण १८०० गणेश मूर्ती संकलित करण्यात आल्या.
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत या सामाजिक संस्थांचे कार्यकर्तेही सक्रिय होते. विसर्जनासाठी आलेल्या गणेश मूर्ती महापालिकेने ठेवलेल्या वाहनांमध्ये सुरक्षितपणे ठेवण्याचे काम करण्यात आले. त्याचप्रमाणे निर्माल्य संकलन, वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी स्वयंसेवकांनी सहकार्य केले.
गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी मूर्तीदानाचा संदेश देणारे पथनाट्य सादर करण्यात आले होते. सातव्या दिवशी मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्था व दिलासा संस्थेचे कार्यकर्ते यांनी एकत्र येत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांबरोबर उत्स्फूर्तपणे १८०० गणेश मूर्ती संकलित केल्या.
सहाय्यक आरोग्य अधिकारी शांताराम माने यांनी सांगितले की, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग हा खरोखरच कौतुकास्पद आहे. यंदा एकही गणेश भक्त नदी किंवा नदीपात्रात मूर्ती विसर्जनासाठी गेला नाही, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. यावरूनच गणेश भक्तांमध्ये पर्यावरण रक्षणाबाबत जागरूकता निर्माण झाली आहे, असे त्यांनी नमूद केले.
प्रभागाचे मुख्य आरोग्य निरीक्षक शंकर घाटे यांनी सांगितले की, नियोजनबद्ध रीतीने मूर्ती संकलनाची व्यवस्था करण्यात आली होती. गणेश भक्तांनीही आमच्या या उपक्रमात मोलाचे सहकार्य केले असून, पुढील काळातही हे सहकार्य असेच राहील अशी अपेक्षा आहे. दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी सांगितले की, नवव्या आणि दहाव्या दिवशी देखील संस्थेचे कार्यकर्ते महापालिकेच्या आरोग्य विभागासोबत गणेश मूर्ती संकलन, वाहतूक व्यवस्था आणि मूर्ती वाहनांमध्ये चढवण्याचे काम करणार आहेत.
या उपक्रमात मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, ड प्रभागाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी शांताराम माने, प्रभागाचे मुख्य आरोग्य निरीक्षक शंकर घाटे, आरोग्य निरीक्षक रश्मी तुंडलवार, ड प्रभाग अभियंता चंद्रकांत पाटील, आरोग्य विभागाचे शिवाजी निम्हण, मुकादम अजित रोकडे, बेसिक टीमचे शुभम बेंद्रे, सागर पाटील, महाराष्ट्र सुरक्षा बलचे जनार्दन खेडकर, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा अस्मिता खैरनार, कार्याध्यक्ष गजानन धाराशिवकर, सचिव मुरलीधर दळवी, गुणवंत कामगार शंकर नाणेकर, काळुराम लांडगे आणि असंख्य गणेश भक्तांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवला.





