डॅडी परतले! : १७ वर्षांनंतर अरुण गवळी यांची तुरुंगातून सुटका
मुंबईचा डॉन ते आमदार – एक विस्मयकारक प्रवास
नागपूर : मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये ‘डॅडी’ म्हणून ओळख निर्माण करणारे आणि नंतर राजकारणात पाऊल ठेवून आमदारकी मिळवणारे अरुण गवळी अखेर १७ वर्षांनंतर पुन्हा मोकळ्या आकाशाखाली आले आहेत. नागपूर मध्यवर्ती कारागृहातून बुधवारी सकाळी गवळींची अधिकृत सुटका करण्यात आली. या वेळी त्यांच्या कुटुंबीयांसह समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वागताचा जल्लोष केला.
कमलाकर जामसांडेकर हत्येप्रकरणी जन्मठेप
2007 साली शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळी यांच्यावर MCOCA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2012 मध्ये मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना जन्मठेप आणि 17 लाख रुपयांचा दंड ठोठावला.
त्यानंतर तब्बल १७ वर्षे गवळी तुरुंगात होते.
सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा
गवळी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या शिक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.
सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या अटी व शर्तींच्या अधीन राहून त्यांना जामीन मंजूर केला.
या निर्णयामुळे त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आणि आज अखेर त्यांची मुक्तता झाली.
दगडी चाळपासून विधानसभेपर्यंतचा प्रवास
अरुण गवळी यांचा जन्म 17 जुलै 1955 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथे झाला.
मुंबईतील भायखळ्यातील दगडी चाळ या परिसरातून त्यांनी गुन्हेगारीत पाय ठेवला.
एकेकाळी दाऊद इब्राहिमचा सहकारी, नंतर शत्रू बनलेल्या गवळीने स्वतंत्र टोळी उभी केली.
मराठी समाजात वाढत्या लोकप्रियतेमुळे, 1990 च्या दशकात त्यांनी राजकारणात प्रवेश करत ‘अखिल भारतीय सेना’ स्थापन केली.
2004 मध्ये चिंचपोकळी मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले.
गवळींची सुटका केवळ कायदेशीर घटना नाही, तर ती मुंबईच्या अंडरवर्ल्ड-राजकारणाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
डॅडी पुन्हा राजकारणात सक्रीय होणार का? की निवृत्ती घेणार? सध्या तरी याविषयी गवळींनी मौनच पाळले आहे. मात्र त्यांच्या समर्थकांमध्ये पुन्हा एकदा आशेचा किरण दिसू लागला आहे.





