BIG NEWS | कुदळवाडीतील भंगार व्यावसायिकांना सभोवतालच्या गावांत ‘‘नो एन्ट्री’’
महापालिका हद्दीलगतच्या ग्रामपंचायतींचे ठराव : भंगार व्यावसायिकांसमोर पुनर्वसनाचे मोठे आव्हान

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
चिखली-कुदळवाडीमध्ये महानगरपालिका प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईमध्ये विस्थापित झालेल्या भंगार व्यापाऱ्यांनी आता महापालिका हद्दीलगत असलेल्या गावांकडे धाव घेतली. मात्र, सभोवतालच्या ग्रांमपंचायतींनी भंगार व्यावसायिकांना जागा न देण्याबाबत ठराव केले आहेत. त्यामुळे व्यावसायिकांसमोर व्यावसाय पुनर्वसनाचे आव्हान आहे.
शहरातील वाहतूक व्यवस्थापन, इंद्रायणी नदी प्रदूषण, विकास आराखड्यातील रस्ते आणि आरक्षणांमध्ये अतिक्रमण केलेल्या मालमत्ता धारकांना सुरूवातीला महापालिका प्रशासनाने अतिक्रमण काढून घेण्याबाबत नोटीसा बजावल्या होत्या. अतिक्रमण कारवाई सुरू झाल्यानंतर त्याला स्थानिक व्यापाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन विरोध केला. त्यानंतर न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्या होत्या. मात्र, न्यायालयाने कायदा-सुव्यवस्था निर्माण होणार असेल, तर अशा अनधिकृत बांधकामांवर सरसकट कारवाई करा, असे निर्देश दिले.
त्यामुळे महापालिका प्रशासनाने सरसकट कारवाई तीव्र केली. परिणामी, गेल्या 7 दिवसांमध्ये 800 एकरहून अधिक बांधकामे निष्कासित करण्यात आली आहेत. त्यामुळे संबंधित भंगार दुकानदारांनी लगतच्या गावांमध्ये जागा शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
हेही वाचा : विकी कौशलच्या ‘छावा’ची दमदार सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी
दरम्यान, ग्रामपंचायत पिंपळगाव तर्फे खेड प्रशासनाने ग्रामस्थांसाठी जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘‘समस्थ ग्रामस्थ पिंपळगाव तर्फे खेड यांना कळवणेत येते की, चिखली-मोशी येथील भंगार (स्क्रॅप) दुकाने यांना आपल्या परिसरात कोणीही जागा विकत किंवा भाड्याने देवू नये. जेणेकरुन भविष्यात आपल्याला त्रास होईल. अशा त्रासदायक व्यावसायास ग्रामपंचायत कोणत्याही प्रकारची परवागनी देणार नाही.’’ याचधर्तीवर कुरूळी, केळगाव, मरकळ आदी विविध ग्रामपंचायतींनी ठराव केले आहेत.
कुदळवाडीसारखी परिस्थिती गावात नको..
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने शहरात अतिक्रमण कारवाई सुरू केली आहे. चिखली-कुदळवाडी येथे अनधिकृत भंगार दुकाने, गोदामे आणि बेकायदा इंडस्ट्रीज हटवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या व्यावसायिकांनी आता महापालिका हद्दीलगत असलेल्या गावांमध्ये व्यावसाय सुरू करण्यासाठी जागा शोधत आहेत. वास्तविक, गेल्या 25-30 वर्षांपासून चिखली-कुदळवाडीमध्ये मोठ्या प्रमाणात हा व्यावसाय केला जात होता. त्यामुळे हवा, पाणी आणि ध्वनी प्रदूषण, वाढती गुन्हेगारी यासह अवैध व्यावसाय वाढले होते. परिणामी, पिंपरी-चिंचवडसह आसपासच्या परिसराच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. वाहतूक कोंडी आणि आपतकालीन परिस्थितीमध्ये होणारी असुविधा यामुळे परिसरातील सोसायटीधारक मोठ्या प्रमाणात त्रस्त होते. असा मन:स्ताप आपल्या गावात होवू नये, अशी भूमिका विविध गावांतील ग्रामस्थांकडून बोलून दाखवली जात आहे.