संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर! निगडी–पिंपरी मेट्रो काम तातडीने थांबवावे
भाजपा चिटणीस सचिन काळभोर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

पिंपरी चिंचवड : संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यंदाही पारंपरिक मार्गाने, दिनांक १९ जून २०२५ रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील निगडी येथे दाखल होणार आहे. हजारो वारकरी भाविक पायी वारी करत देहू ते पंढरपूर मार्गक्रमण करणार आहेत. या पार्श्वभूमीवर निगडी ते पिंपरी दरम्यान सुरू असलेल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामामुळे रस्ता अरुंद झाला असून वारी व्यवस्थापनात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे की, १० जून २०२५ पासून पालखी मार्गावरील मेट्रो काम तातडीने स्थगित करावे.
🛑 प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे:
निगडी ते पिंपरी मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम तातडीने थांबवावे
रस्त्यावरील लोखंडी पत्र्यांचे कंपाऊंड काढावे व दिशादर्शक फलक लावावेत
अतिक्रमण मुक्ती करून वारकऱ्यांसाठी रस्त्याची मोकळी व्यवस्था करावी
मोठ्या वाहनांची वाहतूक बंदी लागू करावी
प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी ट्रॅफिक वॉर्डन नेमावेत.
महिला पोलिस तैनात करण्यात यावे जेणेकरून महिला वारकऱ्यांच्या सुरक्षेसंदर्भात काही अडचणी येऊ नयेत.
हेही वाचा – ‘RCB’च्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू तर 20 जण गंभीर जखमी
वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा :
रस्त्यावर सुलभ शौचालये व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
आरोग्य सेवा आणि आरोग्य पथके तैनात करावीत
मुक्काम स्थळी भोजन, निवास, स्वच्छता यांची पुरेशी सोय करावी
सामाजिक संस्थांच्या सहकार्याने अन्नदान व सेवा केंद्र उभारावीत
रात्रीसाठी रस्त्यावर पुरेशी प्रकाश व्यवस्था ठेवावी
सचिन काळभोर यांनी स्पष्ट केले की, हजारो वारकरी भगवंताच्या नामस्मरणात रमलेले असतात, ते कोणत्याही अडचणीला कारणीभूत ठरू नयेत, यासाठी प्रशासनाने योग्य ती पावले उचलावीत. जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात तातडीने बैठक घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी त्यांनी नम्र विनंती केली आहे.
वारकरी परंपरेचा सन्मान राखत वारी व्यवस्थित पार पडावी यासाठी प्रशासन, पोलिस यंत्रणा आणि सामाजिक संस्था यांनी एकत्रितपणे समन्वय ठेवावा, असा संदेश या निवेदनातून दिला गेला आहे.