PMPML: पीएमपीएमएल तिकीट दरवाढ कमी करून सामान्य नागरिकांना दिलासा द्या; तुषार कामठे यांची मागणी
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना निवेदन : दरवाढीमुळे बस प्रवास करणाऱ्यांवर आर्थिक बोजा

पिंपरी-चिंचवड: पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) अंतर्गत नुकत्याच लागू करण्यात आलेल्या बस तिकीट दरवाढीवर पुनर्विचार करावा. ही दरवाढ कमी करून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी केली आहे.
तुषार कामटे यांनी यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांना निवेदन दिले आहे.
हेही वाचा – हिंदी भाषेचा मुद्दा पुन्हा तापणार; राज ठाकरेंचं शिक्षण मंत्र्यांना पत्र, काय केली मागणी?
तुषार कामठे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पीएमपीएमएलची करण्यात आलेली तिकीट दरवाढ ही सामान्य नागरिकांवर, विशेषतः दैनंदिन प्रवास करणाऱ्या कामगार, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांवर मोठा आर्थिक बोजा निर्माण करणारी आहे. सार्वजनिक वाहतूक ही शहरातील सर्वसामान्यांच्या दैनंदिन गरजेचा महत्त्वाचा भाग आहे. आणि ही वाहतूक सेवा नागरिकांना परवडणारी असणे आवश्यक आहे.
या दरवाढीमुळे बस प्रवास करणाऱ्यांवर आर्थिक बोजा पडून त्यांचे आर्थिक नियोजन बिघडणार आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर खासगी वाहनांचा वापर वाढण्याची शक्यता आहे. ज्यामुळे वाहतूक कोंडी आणि पर्यावरण प्रदूषणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याचाच सारासार विचार करून पी पीएमपीएमएलची ही दरवाढ मागे घ्यावी व सर्व सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी तुषार कामठे यांनी केली आहे.