‘पुढच्या पावसाळ्यापूर्वी राजमाची रस्त्याचे काम होणार’; आमदार सुनील शेळके

पिंपरी : लोणावळा शहराच्या लगत असलेले मात्र आजपर्यंत विकासापासून वंचित राहिलेल्या राजमाची गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम पुढील पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याचा मानस आमदार सुनील शेळके यांनी बोलून दाखविला.
या रस्त्याकरिता आदिवासी विभागाकडून चार कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करून घेण्यात आला आहे. मात्र सदरचा रस्ता हा वनविभागाच्या जागेतून जात असल्याने त्यांची परवानगी महत्वाची आहे. याकरिता नागपूर व मंत्रालय या दोन ठिकाणी पाठपुरावा करीत पुढील सहा ते आठ महिन्यांमध्ये सदर रस्त्याचे काम करून घेण्याचा शब्द मी तेथील ग्रामस्थांना दिला असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.
आमदार सुनील शेळके म्हणाले, राजमाची गाव हे अतिशय दुर्गम ठिकाणी आहे. मागील पाच वर्षात मी दोन वेळा या गावाला भेट दिली. त्या ठिकाणी सध्या अंतर्गत रस्त्याची कामे सुरू असून पाण्याची टाकी देखील उभी राहिली आहे.गावामध्ये पाईपलाईन फिरवण्याचे काम सुरू असून पुढील दीड ते दोन महिन्यांमध्ये नळाद्वारे पाणी सुरू होईल. मंदिरासमोरील सभा मंडपाची मागणी करण्यात आली होती, ते काम देखील करून देण्यात आले आहे.
हेही वाचा – ‘सरकार कुणाचंही असो आठवलेंच मंत्रिपद पक्क’; नितीन गडकरींची मिश्किल प्रतिक्रिया
याठिकाणी अद्यापपर्यंत लाईट पोहोचलेली नाही. लाईट पोचविण्यासाठी साधारणतः सात ते आठ कोटी रुपयांचा खर्च अंदाजीत करण्यात आला आहे.मात्र तेवढे बजेट मावळ तालुक्याचे नसल्याने दोन टप्प्यांमध्ये सदरचे काम करण्याचे सूचित करण्यात आले आहे.येत्या काळामध्ये तेथील विजेची समस्या देखील सोडवण्याचा प्रयत्न असणार आहे. त्या ठिकाणी पूर्वी काही संस्थांनी सोलर पॅनल द्वारे लाईट लावली होती. मात्र जोरदार वारा व पाऊस यामुळे त्या ठिकाणी ते टिकत नसल्याचे निदर्शनास आले आहे.याकरिता विजेचे खांब टाकत त्या ठिकाणापर्यंत टप्प्याटप्प्याने वीज घेऊन जाण्याचा प्रयत्न असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी स्पष्ट केले.
वनविभागाच्या अखत्यारीमध्ये राजमाची गाव व सर्व परिसर असल्याने विकास कामे करण्यात अडचणी येतात, हे निश्चित असले तरी त्यावर मार्ग काढत तो तडीस नेण्याचा प्रयत्न आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून होताना दिसत आहे. यापूर्वी माजी आमदार बाळा भेगडे यांनी रस्त्यावर काही साकव पुल उभारले होते.
पर्यटन नगरी लोणावळा शहरापासून अवघ्या १६ किलोमीटर अंतरावर राजमाची हे गाव आहे. देश स्वतंत्र होऊन ७७ वर्षे झाली मात्र आजही या गावांमध्ये वीज नाही, पिण्याचे पाणी नाही. तसेच गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता देखील नाही.अनेक सरकारी आली व गेली, अनेक आमदार या मावळ तालुक्याने पाहिले. मात्र कोणीही राजमाची गावातील मूलभूत समस्या सोडविण्याकडे लक्ष दिले नव्हते.





