विजांच्या कडकडाटासह पावसाने उद्योगनगरीला झोडपले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/Mahesh-Landge-1-12-780x470.jpg)
पिंपरी : येत्या चोविस तासात पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात विजांच्या कडकडाट आणि वादळी वा-यासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील सर्व शासकीय आस्थापनांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात पावसाला सुरुवात झाली आहे. मागील तीन दिवसांपासून आकाशात ढग दाटून आल्याने कधी दुपारी, कधी सायंकाळी तर कधी रात्री पाऊस पडू लागला आहे. काल सकाळपासूनच आकाशात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने दुपारी दोन वाजता हलक्या सरींना सुरुवात झाली.
मंद गारवा आणि झाकाळून आलेल्या वातावरणात पाऊस पडत होता. वातावरणात धुके दाटल्यामुळे परतीच्या पावसाची चाहूल नव्हे तर मॉन्सुनच्या आगमनाची अनूभुती येत होती. दुपारी चारनंतरही गडगडाटासह पावसाचा जोर वाढत होता. सायंकाळी पावसाचा जोर वाढल्याने उद्योगनगरीतील चाकरमान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले.
हेही वाचा – ‘मला मुख्यमंत्री बनायचं आहे. पण..’; अजित पवारांचं विधान चर्चेत
दरम्यान, पुढील २४ तासात पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्याला हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला. वादळी वा-यासह विजांचा कडकडाट होणार असून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला.
दरम्यान, ३० ते ४० प्रतितास वादळी वारा वाहणार आहे. त्याचा फटका बीड, सातारा, रायगड, ठाणे, नाशिक, धुळे, छत्रपती संभाजीनगरसह पुणे जिल्ह्याला बसणार असल्याचे सूचित करण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी दुपारीचा शहरात अतिवृष्टीला सुरूवात झाली.
पावसाचा जोर वाढू लागल्याने नदीपात्रात पुर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे लगतच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात, असे आवाहन हवामान खात्याकडून जिल्ह्यातील शासकीय आस्थापनांना करण्यात आले आहे.आज सकाळी हिंजवडी परिसरात पावसाला जोरदार सुरुवात झाली. दुपारपर्यंत पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाची हजेरी नव्हती.
दुपारी दोननंतर वादळी वा-यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, पवना धरण क्षेत्रात असाच पाऊस पडल्यास धरणातून विसर्ग सोडल्यानंतर नदीला पूर येऊन लोकवस्तीत पाणी शिरण्याची भिती आहे.तथापि, पावसामुळे काही भागात पाणी तुंबणार नाही, स्टॉर्म वॉटर लाईन चॉकअप होऊन पाणी रस्त्यावर येणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी आपत्ती व्यवस्थापन तसेच अग्निशामक विभागाला दिल्या आहेत.
त्यानुसार सर्व यंत्रणा सतर्क आहेत. शहराच्या कोणत्या भागात आपत्ती उद्भवल्यास महापालिका मुख्य नियंत्रण कक्ष ०२०-६७३३११ किंवा ०२०-२८३३११११ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे ओमप्रकाश बहिवाल यांनी केले.