पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द; पावसामुळे लागला ब्रेक

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर येणार होते. मात्र मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे मोदींचा दौरा रद्द करण्यात आला आहे.पीएम नरेंद्र मोदी यांची एस.पी कॉलेजच्या मैदानावर जाहीर सभा होणार होती. परंतु मागील दोन दिवसापासून पुणे शहरात जोरदार पाऊस सुरू असल्याने कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चिखल झाला आहे.
याशिवाय आज पुणे शहरासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे एकूणच सध्याची परिस्थिती लक्षात घेतल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा अखेर रद्द करण्यात आला आहे. मेट्रोसह एकूण १२ प्रकल्पांचे त्यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन होणार होते.
हेही वाचा – ‘मला माफ करा, मी माझे शब्द..’; कृषी कायद्याबाबत केलेल्या विधानावरून कंगनाने मागितली माफी
मुसळधार पावसामुळे मोदींच्या सभेतही खंड पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. एस.पी. कॉलेज मैदानावर चिखलाचे साम्राज्य झाले असल्याने पर्यायी जागाचा शोध घेऊन सभेसाठी तयारी देखील सुरू करण्यात आली होती. तसेच आजही पावसाची शक्यता वर्ततवण्यात आली असल्याने नरेंद्र मोदी यांची सभा स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा सभागृहात घेण्यासाठी तयारी करण्यात आली होती.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात बुधवारी काही भागात ढगफुटीसदृश्य, तर काही भागांत मुसळधार पाऊस झाला. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केल्याने जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवस यांनी आज पुणे व पिंपरी चिंचवडमधील सर्व शाळा व महाविद्यालयांना सार्वजनिक सुट्टी जाहीर केली.





