‘दिल्लीत साहित्य संमेलन सुरू नसून राजकीय दलाली सुरू’; संजय राऊतांची टीका

मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. दिल्लीत शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. यावरून संजय राऊतांनी शरद पवारांवर टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचं सरकार पाडलं, बेईमानी केली त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होतं, ही आमची भावना आहे, असं राऊतांनी म्हटलं आहे.
संजय राऊत म्हणाले, की महाराष्ट्रातील लोकांसमोर आम्ही कोणत्या तोंडाने जाणार? राजकारणात कोण-कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो, हे ठीक आहे. पण ज्यांनी महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांना अशाप्रकारे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभीमानाला धक्का लावणारा आहे. ही आमच भावना आहे, कदाचित पवारांची भावना वेगळी असू शकेल. पण हे महाराष्ट्रातील जनतेला पटलेलं नाही. कारण शरद पवारांचा आम्ही आदर करतो.
हेही वाचा : सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश
ज्यांनी शिवसेना फोडली अशांना तुम्ही सन्मानित करता : संजय राऊत
ज्यांनी शिवसेना फोडली अशांना तुम्ही सन्मानित करता यामुळे आम्हाला वेदना झाल्या. दिल्लीतील राजकारण वेगळं असेल, पण यामुळे आम्हाला वेदना झाल्या. काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात. तुमचं आणि अजित पवारांचं गुफ्तगु होत असेल, पण याचं भान राखून आम्ही पुढचं पाऊल टाकतो, असं संजय राऊत म्हणाले.
दिल्लीत साहित्य संमेलन सुरू नसून राजकीय दलाली सुरू आहे. कोणालाही कसेही पुरस्कार देतात. कोणाला कसेही सत्कार करतात. या लोकांचा साहित्याशी संबंध काय? माझा आयोगाला प्रश्न आहे की तुम्ही दिल्लीत दलाली करायला गेलात का? काय तुम्ही साहित्याची सेवा करता? भाजपाचा हा उपद्व्याप आहे. मराठीची काय सेवा केली तुम्ही? महाराष्ट्राच्या मानेवर पाय ठेवणाऱ्यांचा सत्कार करता तुम्ही? हे साहित्य संमेलन नसून दिल्लीतील दलाली आहे. मलाही याचं आमंत्रण असून मी येथे जाणार आहे. जो मराठी माणूस आहे, तो जाणार नाही, असंही संजय राऊत म्हणाले.