पिंपरी-चिंचवड शहरात वाढते प्रदूषण; ‘इ-वाहन’ धोरण राबवा!
राष्ट्रवादी काँग्रेसचे विशाल काळभोर यांचे महापालिकेला निवेदन

पिंपरी-चिंचवड | देशातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरासमोर आता वायू प्रदूषणाचे गंभीर आव्हान उभे ठाकले आहे. शहराची लोकसंख्या सुमारे ३० लाखांच्या घरात पोहोचली असून, दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या तब्बल २५ लाखांच्या आसपास गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वाढती लोकसंख्या, वेगवान नागरीकरण आणि बेसुमार वाहनवाढ यामुळे शहराच्या हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत असल्याचे चित्र आहे.
सध्या शहरातील एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) पातळी १३५ ते १५० दरम्यान नोंदवली जात असून, ही पातळी World Health Organization (WHO) ने निश्चित केलेल्या सुरक्षित मर्यादेपेक्षा सुमारे दहा पट अधिक असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. परिणामी नागरिकांमध्ये श्वसनाचे विकार, दमा, अॅलर्जी, डोळ्यांची जळजळ तसेच हृदयविकारांचे प्रमाण वाढत असल्याची चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते विशाल काळभोर यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देत तातडीने ठोस उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे. त्यांनी दिलेल्या पत्रात शहरातील धूर, धूळ आणि रसायनमिश्रित धुरावर कठोर अंमलबजावणी करण्यावर भर दिला आहे.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये २३ फेब्रुवारी रोजी पाणीपुरवठा तात्पुरता बंद!
बांधकाम स्थळांवर धूळ नियंत्रणासाठी पाण्याची नियमित फवारणी व जाळी आच्छादन अनिवार्य करावे, औद्योगिक क्षेत्रातील धुराचे उत्सर्जन नियमित तपासणीद्वारे नियंत्रणात ठेवावे, तसेच महापालिकेच्या ताफ्यातील सर्व वाहने टप्प्याटप्प्याने ‘इ’ (इलेक्ट्रिक) वाहनांमध्ये रूपांतरित करण्याचे धोरण जाहीर करावे, अशी त्यांची मागणी आहे. याशिवाय सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करून नागरिकांना खासगी वाहनांऐवजी बस व मेट्रोचा वापर करण्यास प्रोत्साहन द्यावे, शहरात अधिकाधिक हरित पट्टे, वृक्षारोपण व ऑक्सिजन पार्क उभारावेत, तसेच प्रत्येक प्रभागात प्रदूषण मोजणी केंद्रे वाढवून AQI माहिती नागरिकांना उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी नमूद केले आहे.
“विकासाच्या स्पर्धेत शहर पुढे जात असले तरी नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार असेल, तर तो विकास नव्हे. भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ हवा हा मूलभूत हक्क आहे. त्यामुळे महापालिकेने तातडीने पर्यावरणपूरक धोरण राबवावे,” असे स्पष्ट मत विशाल काळभोर यांनी व्यक्त केले. शहराच्या झपाट्याने वाढणाऱ्या नागरीकरणासोबत पर्यावरणीय संतुलन राखणे ही आता काळाची गरज बनली आहे. महापालिका प्रशासन या निवेदनावर कोणती भूमिका घेते आणि प्रत्यक्षात कोणत्या उपाययोजना राबवते, याकडे पिंपरी-चिंचवडकरांचे लक्ष लागले आहे.
“पिंपरी-चिंचवडकरांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही. स्वच्छ हवा हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. वायू प्रदूषणाच्या प्रश्नावर आम्ही केवळ निवेदन देऊन थांबणार नाही, तर महापालिकेकडून ठोस आणि वेळबद्ध कृती आराखडा जाहीर होईपर्यंत सातत्याने पाठपुरावा करू. शहराच्या विकासासोबत पर्यावरणाचे संतुलन राखणे हीच आमची प्राथमिकता आहे.”
– विशाल काळभोर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.




