दैनंदिन आहारात ‘फायबर’ वाढवण्यासाठी ‘फायबरमॅक्सिंग’चा फंडा; तरुणाईमध्ये वाढतेय क्रेझ

FiberMaxing Diet : गतवर्षी सोशल मीडियावर प्रोटिन्स अर्थात प्रथिनांचा ट्रेंड प्रचंड गाजला होता. अलीकडील काळात समाजमाध्यमांवर ‘फायबरमॅक्सिंग’ हा शब्द वेगाने लोकप्रिय होत आहे. आपल्या दैनंदिन आहारात तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्तीत जास्त वाढवणे आणि प्रामुख्याने नैसर्गिक स्रोतांवर भर देणे, ही या प्रवाहाची मूळ संकल्पना आहे.
वैद्यकीय संशोधनानुसार, एका प्रौढ व्यक्तीला दिवसाला किमान 25 ते 35 ग्रॅम फायबरची गरज असते. परंतु, दुर्दैवाने आधुनिक जीवनशैलीत प्रक्रिया केलेले पदार्थ आणि अतिशुद्ध पिठाच्या वापरामुळे हे प्रमाण सरासरी 10 ते 12 ग्रॅमपर्यंत खाली आले आहे. फायबरमॅक्सिंग हा ट्रेण्ड याच कमतरतेवर लक्ष केंद्रित करतो. फायबरचे दोन मुख्य प्रकार असतात; विद्राव्य (सोल्युबल) आणि अविद्राव्य (इन्सोल्युबल). विद्राव्य फायबर रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते, तर अविद्राव्य फायबर पचनसंस्थेचे कार्य सुरळीत ठेवते. या दोन्ही प्रकारांचा समतोल राखणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
या ट्रेंडचा सर्वात मोठा फायदा म्हणजे रक्तातील साखरेचे नियंत्रण. आपण उच्च फायबरयुक्त आहार घेतो, तेव्हा कर्बोदकांचे साखरेत रूपांतर होण्याची प्रक्रिया मंदावते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी एकदम वाढत नाही; परिणामी इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होतो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी आणि वजन कमी करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी हे अत्यंत प्रभावी ठरते. तसेच, तंतुमय पदार्थ खाल्ल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते, ज्यामुळे अनावश्यक कॅलरी घेण्याचे प्रमाण नैसर्गिकरीत्या कमी होते.
हेही वाचा – रणवीरवर नाही, तर FWICE वर बंदी घाला; बड्या दिग्दर्शकाचे खळबळजनक वक्तव्य
सध्या ‘गट हेल्थ’ म्हणजेच आतड्यांच्या आरोग्यावर जागतिक स्तरावर मोठी चर्चा सुरू आहे. आपल्या आतड्यांमध्ये अब्जावधी सूक्ष्मजीव असतात, ज्यांना ‘मायक्रोबायोम’ म्हणतात. फायबर हे या उपयुक्त जीवाणूंचे मुख्य अन्न आहे. आपण फायबरमॅक्सिंगचा अवलंब करतो, तेव्हा या जीवाणूंची संख्या वाढते, ज्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. संशोधनात असेही दिसून आले आहे की, निरोगी आतड्यांचा थेट संबंध आपल्या मानसिक आरोग्याशी आणि मेंदूच्या कार्यक्षमतेशी असतो.
फायबरमॅक्सिंग सुरू करताना अचानक आहारात फायबरचे प्रमाण वाढवल्यास गॅस किंवा पोटफुगीसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे तज्ज्ञांच्या मते, याची सुरुवात हळूहळू करावी. दर आठवड्याला फायबरचे प्रमाण थोडे थोडे वाढवत नेणे आणि त्यासोबत पाण्याचे भरपूर सेवन करणे अनिवार्य आहे. आहारात ओटस्, पालेभाज्या, फळे, डाळी, कडधान्ये आणि सालासकट धान्यांचा समावेश करणे हा फायबरमॅक्सिंगचा सर्वात सोपा मार्ग आहे. थोडक्यात सांगायचे तर, फायबरमॅक्सिंग ही काळाची गरज आहे. प्रक्रिया केलेल्या अन्नाच्या जाळ्यात अडकलेल्या मानवी शरीराला पुन्हा निसर्गाकडे नेणारा हा एक मार्ग आहे. केवळ वजन कमी करण्यासाठीच नव्हे, तर दीर्घायुष्यासाठी आणि सुदृढ आयुष्यासाठी हा सर्वात प्रभावी मंत्र ठरणार आहे.





