पोलिस आयुक्तांनी जाणून घेतल्या तळेगाव एमआयडीसीतील उद्योजकांच्या समस्या

तळेगाव : तळेगाव दाभाडे एमआयडीसी हद्दीतील सर्व औद्योगिक कंपन्यांचे प्रतिनिधी व पोलिस विभाग यांची जेसीबी कंपनीच्या मिंटीग हॉलमध्ये आढावा बैठकीचे आयोजन गुरुवार (दि.२६) रोजी करण्यात आले होते. सदर बैठक पोलिस आयुक्त पिंपरी-चिंचवड विनयकुमार चौबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी पोलिस आयुक्त व पोलिस प्रशासनाने तळेगाव एमआयडीसीतील उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात येईल, असे आश्वासन पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले.
पोलिस उपायुक्त परिमंडल २ पिंपरी चिंचवडचे विशाल गायकवाड यांनी बैठकीची प्रस्तावना केली. तसेच पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी कंपनीचे प्रतिनिधीशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. त्यामध्ये प्रामुख्याने नवलाख उंबरे, जाधववाडी रस्त्यावर होणारी वाहतूककोंडी, नवीन रस्त्याच्या बाबतीत जमीन अधीग्रहण रस्त्याची दुरवस्था, होणारे अपघात व इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. सदर प्रश्नांबाबत वाहतूक विभागाचे अधिकारी, एमआयडीसी अधिकारी, एमएसईबी अधिकारी यांनी त्याबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजना सांगून समस्यांचे निरसण केले.
हेही वाचा – निवडणूक आयोगाकडून ‘त्या’ ३४५ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू
यावेळी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील औद्योगिक तक्रारींचे निवारण करण्याकरिता आयुक्तालयात इंडस्ट्रियल ग्रिव्हियन्स सेल या विभागाची स्थापना करण्यात आलेली आहे. सदर कक्षामार्फत औद्योगिक विभागाच्या अडीअडचणी सोडविण्यात येतात, तळेगाव एमआयडीसीमधील औद्योगिक कंपन्या यांनी चांगल्या प्रकारचे सीसीटीव्ही बसविण्यात यावे. कंपनीने कामगारांचे होणारे अपघात टाळण्यासाठी कामगारांना हेल्मेट वापरणेबाबत पुढाकार घ्यावा. बैठक संपल्यावर आयुक्तांनी हुंदाई कंपनी येथे भेट देऊन हुंदाई कंपनी पॅन्ट हेड शाम सिंग यांच्याकडून कंपनीबाबत सर्व माहिती घेतली. यावेळी कंपनीला सुरक्षेबाबत काही सूचना केल्या.
बैठकीमध्ये ५० ते ६० कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त इंडस्ट्रियल सेल तथा गुन्हे शाखा विशाल हिरे, महावितरण तळेगाव दाभाडेचे उपअभियंता जयप्रकाश सागरे, महावितरण सहाय्यक अभियंता इंदोरी विभागचे प्रशांत पवार, एमआयडीसीचे सहाय्यक अभियंता राजेश धोत्रे, तळेगाव दाभाडे एमआयडीसी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित जाधव, सामाजिक सुरक्षा सेलचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक वाहतूक विभागचे गणेश लोंढे आणि इतर पोलिस कर्मचारी उपस्थित होते.