भारतात सॅटेलाइटच्या माध्यमातून हाय-स्पीड इंटरनेट सेवा
सॅटेलाइटवरून थेट घरात पोहोचवणार सुपरफास्ट इंटरनेट!

राष्ट्रीय : भारताच्या डिजिटल युगात एक नवा अध्याय जोडला जाणार आहे. स्पेसएक्स (SpaceX) या कंपनीची उपकंपनी असलेली Starlink लवकरच भारतात सॅटेलाइटच्या माध्यमातून हाय-स्पीड इंटरनेट सेवा सुरू करणार आहे. या सेवेचा सर्वात मोठा फायदा ग्रामीण, दुर्गम आणि इंटरनेटपासून वंचित भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना होणार आहे.
Starlink ला भारत सरकारकडून ‘Letter of Intent’ (LoI) मिळालेला असून, आता शेवटचा टप्पा म्हणजे Global Mobile Personal Communication by Satellite (GMPCS) परवाना मिळणं बाकी आहे. सरकारकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर, स्टारलिंक भारतात आपली सेवा अधिकृतपणे सुरू करू शकेल. सध्या भारतात OneWeb आणि रिलायन्स जिओसारख्या काही मोजक्या कंपन्यांकडे सॅटेलाइट इंटरनेटचे परवाने आहेत, त्यामुळे स्टारलिंक ही एक तिसरी मोठी खेळाडू ठरणार आहे.
स्पीड आणि किंमत काय असेल?
Starlink च्या इंटरनेट स्पीडबद्दल जागतिक स्तरावरचा अनुभव पाहता, भारतातही २५ Mbps ते २२० Mbps पर्यंतचा वेग मिळू शकतो. काही युजर्सना १०० Mbps पेक्षा जास्त स्पीड अनुभवास येतो. हा वेग वीडिओ स्ट्रीमिंग, ऑनलाईन गेमिंग, वर्क फ्रॉम होम, आणि मोठ्या फायली डाऊनलोड करण्यासाठी पुरेसा आहे.
हेही वाचा : स्मार्ट प्रकल्पांतर्गत कापूस, हळद आणि मका पिकांसाठी हेजिंग डेस्क; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
भारतात ही सेवा लाँच करताना कंपनी एक परवडणारा अनलिमिटेड डेटा प्लॅन ऑफर करू शकते, ज्याची संभाव्य किंमत दरमहा फक्त $10 म्हणजेच अंदाजे ₹850 ते ₹900 इतकी असणार आहे. ही किंमत भारतातील ग्रामीण आणि मध्यमवर्गीय ग्राहकांसाठी एक मोठा आकर्षण ठरेल.
दुर्गम भागांसाठी मोठा बदल
Starlink इंटरनेटचा सर्वात मोठा फायदा भारताच्या डोंगराळ, आदिवासी, व ग्रामीण भागांना होणार आहे. जिथे Fiber Optic नेटवर्क पोहोचलेलं नाही, तिथे सॅटेलाइट तंत्रज्ञानामुळे थेट आकाशातून इंटरनेट मिळणार आहे. यामुळे शिक्षण, आरोग्य सेवा, डिजिटल व्यवहार, सरकारी योजनांचा लाभ या गोष्टी सोप्या आणि सहज उपलब्ध होतील.
स्टारलिंकची ही सेवा ‘डिजिटल इंडिया’ अभियानाला नवी चालना देईल. इंटरनेट हे आज केवळ करमणुकीचं माध्यम राहिलेलं नाही, तर ते शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि नागरिक सेवा यांसाठी अत्यावश्यक बनलं आहे.
सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर पुढील काही महिन्यांत Starlink सेवा भारतात सुरू होईल अशी अपेक्षा आहे. एलन मस्क यांची ही योजना भारताच्या डिजिटल भविष्याच्या दृष्टीने एक क्रांतिकारी पाऊल ठरेल, यात शंका नाही.