मंदीवर मात : पीसीसीओई जॉब फेअरमध्ये २,२२३ विद्यार्थ्यांना रोजगार!
शिक्षण विश्व: १५ हजार रिक्त जागांसाठी २०५ नामांकित कंपन्यांचा सहभाग

पिंपरी-चिंचवड | पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग (पीसीसीओई), निगडी येथे आयोजित “पीसीसीओई जॉब फेअर २०२६” ने रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने उल्लेखनीय यश संपादन करत २,२२३ विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या.
बोर्ड ऑफ अप्रेंटिसशिप ट्रेनिंग (BOAT), महाराष्ट्र असोसिएशन ऑफ टीपीओ (MaTPO) आणि ऑल इंडिया टीपीओ असोसिएशन (AITPO)यांच्या सहकार्याने पार पडलेल्या या मेळाव्यात देशभरातील २०५ नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला. एकूण १५,००० हून अधिक रिक्त पदांसाठी ऑनलाईन परीक्षा, गटचर्चा, तांत्रिक मुलाखती आणि वैयक्तिक मुलाखती घेण्यात आल्या.
या उपक्रमासाठी १३,९९१ उमेदवारांनी नोंदणी केली होती. डिप्लोमा, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. या सर्वसमावेशक निवड प्रक्रियेतून २,२२३ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली, अशी माहिती पीसीईटी सेंट्रल प्लेसमेंट सेलचे अधिष्ठाता डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी दिली.

हेही वाचा
क्षमता, आत्मविश्वास ही यशस्वी फार्मासिस्टची गुरुकिल्ली : डॉ. वेदप्रकाश मिश्रा
या जॉब फेअरमध्ये कमिन्स इंडिया, पियाजिओ व्हेईकल्स, टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स, महिंद्रा अँड महिंद्रा, ह्युंदाई, अॅटलस कॉप्को, भारत इलेक्ट्रॉनिक्स, ईटन, सँडविक, फियाट इंडिया यांसह अनेक आघाडीच्या कंपन्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रतिष्ठित उद्योगांमध्ये करिअर घडविण्याच्या संधी उपलब्ध झाल्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन पी. एन. जुमले (संचालक, BOAT) यांच्या हस्ते झाले. यावेळी ऋतुजा बनकर (उपसंचालक, कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय), एन. एन. वादोडे, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रवंदळे यांनी केले, तर सूत्रसंचालन रोशनी गोडबोले यांनी केले.

‘पंतप्रधान इंटर्नशिप योजनेची माहिती…
डॉ. जुमले यांनी सांगितले की, केंद्र सरकारने २०२५-२६ या वर्षात नॅशनल अप्रेंटिस ट्रेनिंग स्कीमअंतर्गत २५० कोटी रुपयांचा निधी प्रशिक्षणार्थींसाठी उपलब्ध करून दिला आहे. पश्चिम विभागात ५,५०० आस्थापनांमार्फत १.५१ लाखांहून अधिक उमेदवारांना अप्रेंटिसशिपची संधी देण्यात आली आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर दिले जाणारे कौशल्य प्रमाणपत्र नोकरीचा अनुभव म्हणून ग्राह्य धरले जाते. उपसंचालक ऋजुता बनकर यांनी ‘पंतप्रधान इंटर्नशिप योजना’ विषयी माहिती देताना सांगितले की, १८ ते २५ वयोगटातील युवकांना ६ ते ९ महिन्यांच्या कालावधीसाठी इंटर्नशिपची संधी देण्यात येते. या अंतर्गत दरमहा ९,००० रुपयांचे मानधन दिले जाते.
या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्राध्यापक, कर्मचारी व २०० हून अधिक विद्यार्थी प्रतिनिधींनी विशेष परिश्रम घेतले.





