PCMC | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे अपघातांचा धोका!
मेघा सोसायटीधारक त्रस्त : महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

चिंचवड | पावसाळा तोंडावर येऊनही पिंपरी-चिंचवड महानगरपालिका नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी गंभीर असल्याचं चित्र दिसून येत नाही. संभाजीनगर, चिंचवड येथील मेघा सोसायटी (RH-179, MIDC G-Block) येथील रहिवाशांनी वेळोवेळी महानगरपालिकेकडे तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
सदर सोसायटीच्या समोर, चेतना हॉस्पिटलजवळ एक मोठं उंबराचं झाड आहे. या झाडाचे उंबर (फळं) प्रचंड प्रमाणात झाडाखाली पडतात. पावसाळ्यात या उंबऱ्यांवरून दुचाकीस्वार किंवा पादचारी घसरून अपघात होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे रहिवाशांनी झाडाच्या मोठ्या फांद्या छाटाव्यात अशी विनंती महानगरपालिकेला निवेदनाद्वारे केली होती. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
हेही वाचा : विभागीय आयुक्तांनी घेतला मान्सूनपूर्व तयारीचा विभागस्तरीय आढावा
सोसायटीधारकांची मागणी काय?
महिन्यांपूर्वी निवेदन दिलं गेलं असतानाही अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. परिणामी नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. मेघा सोसायटीतील एका रहिवाशाच्या म्हणण्यानुसार, “महापालिकेने वेळेत लक्ष दिलं नाही तर येत्या पावसात अपघात अटळ आहेत. सुरक्षिततेसाठी झाडाच्या फांद्या तात्काळ कापाव्यात.” महानगरपालिकेने मान्सून सुरू होण्याच्या आधी ही समस्या सोडवावी. अन्यथा अपघात झाल्यास जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्नही सोसायटीधारकांनी उपस्थित केला आहे.