पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हिंसाचार; मुर्शिदाबादमध्ये बॉम्बस्फोटानंतर दोन गटांमध्ये तुफान राडा

West Bengal Assembly Election | पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुर्शिदाबाद जिल्ह्यात मतदानाच्या पूर्वसंध्येला झालेल्या हातबॉम्ब स्फोटानंतर आज सकाळी दोन पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी आणि दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून काही वेळात परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
मुर्शिदाबादमधील नाओदा परिसरात मतदानाच्या आदल्या दिवशी सायंकाळी सुमारे ८ वाजता हातबॉम्ब फेकल्याची घटना घडली. या स्फोटात एक महिला जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी महिलेने नमाज अदा करण्यासाठी घराबाहेर पडली असताना हा स्फोट झाल्याचे सांगितले. या घटनेत जनता उन्नयन पार्टीचे नेते हुमायून कबीर यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा
मतदानादिवशी दोन गट आमनेसामने; दगडफेक
हातबॉम्ब स्फोटाच्या घटनेनंतर आज सकाळी मुर्शिदाबादमध्ये तृणमूल काँग्रेस आणि आम जनता उन्नयन पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारी आणि दगडफेकीत झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
सकाळी १ वाजेपर्यंत ६२.१८ टक्के मतदान
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मोठ्या उत्साहात मतदान पार पडत आहे. सकाळी १ वाजेपर्यंत राज्यात ६२.१८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळत असून ‘SIR’ हा मुद्दादेखील निवडणुकीत चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.





